100च्या स्पीडने कार चालवून अनेकांना उडवणारा धनिकपुत्र पुटपुटत राहिला; ओम नम: शिवाय

वडोदरा: गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वडोदऱ्यातील करेलीबाग परिसरात हा अपघात (Car Accident) झाला. या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री ही घटना घडली. यावेळी दारुच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्या रक्षित चौरासिया या तरुणाने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातानंतर गाडी चालवणाऱ्या तरुणाचा माज कायम होता. तो बाहेर उतरुन जोरजोराने ओरडत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.

करेलीबागच्या आमप्राली चार रस्ता या वाहतुकीने गजबजलेल्या परिसरात हा अपघात घडला. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एक काळ्या रंगाची भरधाव वेगातील कार रस्त्यावरील बाईकस्वारांना उडवत जात होती. यामध्ये हेमालीबेन पटेल या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.  यामध्ये जैनी ( वय 12), निशाबेन (वय 35), एक 10 वर्षांचा मुलगा आणि एका 40 वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. या सगळ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

धनिकपुत्र गाडीतून उतरुन बडबडत राहिला

एका बाईकला धडक दिल्यानंतर ही कार थांबली तेव्हा रस्त्यावरील लोक त्याठिकाणी जमले. मात्र, कार चालवणारा रक्षित चौरासिया  हा त्यावेळी प्रचंड नशेत होता. विशाल चौरासिया  गाडीतून बाहेर पडून ‘अनदर राऊंड, अनदर राऊंड, अनदर राऊंड निकिता’, असे जोरजोराने बोलत होता. त्याला पाहून जमाव आक्रमक झाल्यानंतर या तरुणाने ‘ओम नम: शिवाय’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यानंतर लोकांनी पकडून या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरुवात झाली आहे. रक्षित चौरासियाने अंमली पदार्थांचे सेवन केले होते का, याची तपासणी पोलीस करत आहेत.

या अपघाताच्यावेळी कारचा वेग ताशी 100 किलोमीटर इतका होता. रक्षित चौरासिया हा तरुण गाडी चालवत होता. हा तरुण वडोदरा येथील एम.एस. विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत होता. अपघाताच्यावेळी तो प्रचंड नशेत होता. त्याने रस्त्यावरील दोन-तीन बाईक्स उडवल्या. अपघातावेळी जोरदार धडकेने कारच्या एअरबॅग्ज उघडल्या. त्यामुळे रक्षित चौरासिया आणि त्याच्या मित्रांचा जीव वाचला. अपघातानंतर त्याच्या शेजारी बसलेला मित्र कारमधून लगेच बाहेर पडला. ही गाडी रक्षितचा मित्र प्रांशू चौहान याच्या मालकीची होती. पोलिसांनी रक्षित चौरासिया आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा

पुण्यातील दशभुजा गणपतीनजीक भीषण अपघात; भरधाव बाईक ड्रायव्हरला सोडून सुटली सुसाट, भयानक व्हिडिओ व्हायरल

अधिक पाहा..

Comments are closed.