SRH vs RR: वयाच्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! सुरेश रैना यांच्या महाविक्रमाची केली बरोबरी
आयपीएल 2026 (Indian premiere league) मध्ये जर कोणत्या एका खेळाडूने आपल्या फलंदाजीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असेल, तर तो म्हणजे राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). एलिमिनेटरसारख्या जी मोठ्या सामन्यातही या युवा फलंदाजाची बॅट त्याच बेधडक अंदाजात तळपली आणि त्याने एकामागून एक अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केले.
मुल्लानपूर येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या एलिमिनेटर सामन्यात वैभवने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावून इतिहास रचला. या धमाकेदार खेळीसह त्याने आयपीएल प्लेऑफ सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याच्या सुरेश रैनाच्या (Suresh Raina) 12 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली. 2014 च्या क्वालिफायर सामन्यात पंजाबविरुद्ध रैनाने हा विक्रम केला होता, जो आजवर कुणालाही मोडता आला नव्हता. आता 15 वर्षांच्या वैभवने रैनाच्या बरोबरीने अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
आयपीएल नॉकआउट/प्लेऑफमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे फलंदाज
16 चेंडू – सुरेश रैना विरुद्ध पंजाब किंग्स (2014)
16 चेंडू – वैभव सूर्यवंशी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (2026)
17 चेंडू – ॲडम गिलख्रिस्ट विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (2009)
20 चेंडू – एमएस धोनी विरुद्ध मुंबई इंडियन्स (2012)
वैभवची विक्रमी खेळी इथेच थांबली नाही. त्याने या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा ख्रिस गेलचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडीत काढला आहे. वयाच्या 15 व्या वर्षी अशी कामगिरी करून वैभवने आपण केवळ भविष्यातीलच नाही, तर वर्तमानातीलही एक मोठे खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे. या सामन्यात वैभवने आणखी एक मोठी मजल मारली, तो आयपीएलच्या एका हंगामात 600 धावा पूर्ण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता.
वैभवने अर्धशतक झळकावल्यानंतर शतक पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने आगेकूच केली होती आणि केवळ 28 चेंडूत 97 धावा ठोकल्या होत्या. मात्र, दुर्दैवाने पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला आणि आपले तिसरे आयपीएल शतक पूर्ण करण्यापासून अवघ्या 3 धावांनी हुकला. सध्या वैभव ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वांच्या पुढे आहे. त्याने या खेळीत 12 षटकार लगावले असून, आयपीएलच्या एका डावात 10 पेक्षा जास्त षटकार मारण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सध्या वैभवच्या खात्यात 680 धावा असून, त्यात 65 षटकारांचा समावेश आहे.
Comments are closed.