वैभव सूर्यवंशीचा तोच आळस पुन्हा नडला; लंकेविरुद्ध स्वतःच्याच हाताने विकेट बहाल केली, नेमकं काय

IND A विरुद्ध SL A सामन्यात वैभव सूर्यवंशीची चूक: भारतीय क्रिकेटचा उगवता तारा आणि धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. चालू तिंरगा मालिकेत (Try-Nation A Series) तो सलग दुसऱ्यांदा स्वस्तात बाद झाला. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंका ‘अ’ विरुद्ध फक्त 14 धावांवर बाद झाल्यानंतर, आजच्या सामन्यातही तो 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान, या छोट्या खेळीत त्याने गेल्या काही सामन्यांपासूनचा आपला षटकारांचा दुष्काळ मात्र नक्कीच संपवला.

एका षटकात ठोकल्या 17 धावा!

आयपीएल 2026 मध्ये तब्बल 72 षटकार ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला गेल्या दोन सामन्यांत एकही षटकार मारता आला नव्हता. मात्र, या मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याने नवव्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत हा दुष्काळ संपवला. वैभवने 14 चेंडूंत 21 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.

या सामन्यात भारत ‘अ’ संघाचा कर्णधार तिलक वर्माने टॉस गमावला, ज्यामुळे भारतीय संघाला आधी फलंदाजी करावी लागली. वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंग यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी सावध खेळत केवळ 2 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या ओव्हरमध्ये वैभवचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला. त्याने पहिल्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर शानदार षटकार आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा चौकार ठोकून त्या ओव्हरमधून एकूण 17 धावा वसूल केल्या.

‘तीच’ जुनी चूक पुन्हा नडली

चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर वैभवने आणखी एक चौकार मारला, पण याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर तो आपली विकेट गमावून बसला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या आणि उसळी घेणाऱ्या चेंडूवर वैभवने पायांची हालचाल न करता जागच्या जागी शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीम होऊन पॉइंटच्या दिशेने हवेत गेला, तिथे तैनात असलेल्या वानुजा सहानने कोणतीही चूक न करता एक उत्कृष्ट झेल टिपला आणि वैभवची खेळी संपुष्टात आली. या तिंरगा मालिकेत वैभवला अद्याप मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. त्याने आतापर्यंत या मालिकेत एकूण 79 धावा केल्या असून, यात 15 चौकार आणि फक्त 1 षटकाराचा समावेश आहे.

भारत 'अ' प्लेइंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, निशांत सिंधू, अनुकूल रॉय, अर्शद खान, विप्रज निगम आणि यश ठाकूर.

श्रीलंका ‘अ’ संघाची प्लेईंग इलेव्हन (Playing XI) : निरोशन डिकवेला (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, विशेन हलंबगे, सदीरा समरविक्रमा, अहान विक्रमसिंघे, सहान अराचिगे (कर्णधार), वानुजा सहान, विजयकांत वियास्कंथ, कुगथास मथुलन, चमिका करुणारत्ने आणि मोहम्मद शिराज.

हे ही वाचा –

Ind vs Pak T20 World Cup 2026 : मैदानावर वैर, ट्रॉफीसमोर मैत्री…; भारत-पाकिस्तान सामन्यातील एका फोटोने सगळ्यांनाच चक्रावलं, नेमकं काय घडलं?

Comments are closed.