वैभव सूर्यवंशी पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार! जाणून घ्या नेमके प्रकरण

आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने खळबळ निर्माण केली आहे. त्याने मंगळवारी (७ एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (एमआय) सामन्यात जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्याने या सामन्यात ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते पाहून सर्व त्याचे कौतुक करत आहेत. यादरम्यान भारताच्या माजी क्रिकेटपटू जतीन परांजपेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे, त्यामुळे वैभव भविष्यात एमआयच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

वैभवने एमआय विरुद्धच्या ११ षटकांच्या सामन्यातील १४ चेंडू खेळताना ३९ धावा केल्या. यामध्ये त्याने पाच षटकार आणि एक चौकार मारला. या सामन्याआधी पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे चाहत्यांना बुमराह विरुद्ध सूर्यवंशी लढत पाहण्यासाठी तीन तास प्रतिक्षा करावी लागला. वैभव बुमराहचा कसा सामना करतो, याकडे सर्वांचे लक्ष होते.

वैभवबाबत जतीन यांनी या सामन्याच्या काही तासांआधीच लिहिले, “वैभव सूर्यवंशी आज रात्री त्याच्या भविष्यातील संघाविरुद्ध खेळणार आहे”. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. यावरून एमआयची नजर ‘वंडर किड’वर आहे का असे तर्कवितर्क सुरू झाले.

एमआयला आयपीएलची टॅलेंट फॅक्टरी म्हटले जाते. पाच वेळेचा आयपीएल विजेता एमआयने बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांसारखे स्टार बनवले आहेत. वैभवची त्यांच्याविरुद्धची फलंदाजी पाहता एमआयचा वारसा पुढे नेण्यासाठी तो एक योग्य पर्याय आहे, असे तज्ञांना वाटते.

आयपीएल २०२५ साठीच्या लिलावात वैभवला राजस्थानने १.१ कोटी रुपयांना विकत घेतले. दिल्लीने पहिल्यांदा त्याच्यावर बोली लावली होती, मात्र १ कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर पुढे गेले नाही. तो आयपीएल लिलावात निवडला गेलेला सर्वात तरुण खेळाडू होता. हा लिलाव नोव्हेंबर २०२४ मध्ये झाला आणि आयपीएल २०२५ वेळी तो १४ वर्षांचा झाला. त्याने १९ एप्रिल २०२५ ला आयपीएलमध्ये पदार्पण केले.

वैभवने २०२५ हंगामात शतकी खेळी केली होती. त्या हंगामात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत १०१ धावा करत टी२० क्रिकटच्या इतिहासातील सर्वात युवा शतकवीर बनला. त्याने खेळलेल्या ७ सामन्यात २५२ धावा केल्या होत्या.

Comments are closed.