IND vs ENG: पदार्पणानंतरच्या पुढच्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीला डच्चू मिळणार? माजी खेळाडूचा निवडकर्त्यांना मोलाचा सल्ला!
वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) गेल्या शनिवारी (4 जुलै) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या सामन्यात त्याने 10 चेंडूंचा सामना करत 2 षटकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. तो मोठी खेळी करू शकला नाही, त्यामुळे आता पुढच्या सामन्यात त्याला संघातून वगळले जाईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर भारताचे माजी खेळाडू लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Shivramkrishanan on vaibhav suryavanshi) यांनी आपले मत मांडले आहे.
त्यांच्या मते, वैभवला पुढच्या सामन्यातही खेळवणे चालूच ठेवले पाहिजे. त्याला संघातून काढणे किंवा ब्रेक देणे योग्य ठरणार नाही. त्याला सध्या आरामाचीही अजिबात गरज नाही. पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेशी बोलताना लक्ष्मण शिवरामकृष्णन म्हणाले, वैभवला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पुरेसे सामने खेळण्याची संधी दिली पाहिजे आणि त्यानंतर त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले पाहिजे. त्याला संघात कायम ठेवावे. त्याला ब्रेक किंवा विश्रांती देण्याचा काहीही अर्थ नाही. त्याला आरामाची गरज नाही, तो वर्षभर सतत क्रिकेट खेळू शकतो.
माजी भारतीय खेळाडू पुढे म्हणाले, फलंदाज म्हणून त्याला गोलंदाजांसारख्या शारीरिक तंदुरुस्तीची (Fitness) गरज नसते. तो जेवढा जास्त वेळ फलंदाजी करेल, तेवढी त्याची एकाग्रता आणि मानसिक क्षमता वाढेल, ज्यामुळे त्याला दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून राहण्यास मदत होईल.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी पुढे स्पष्ट केले, एकदा तुम्ही त्याला संघात घेण्याचे ठरवले, तर तुम्हाला त्याला पुरेसा वेळ आणि संधी द्यावी लागेल. लक्षात ठेवा, तो पुढच्या 20 वर्षांसाठीची गुंतवणूक आहे. सध्या वैभवला संघ प्रशिक्षक, कर्णधार आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. जर तो काही सामन्यांत चांगली कामगिरी करू शकला नाही, तरीही त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला पाठिंबा देणे गरजेचे आहे.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 3rd T20) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना 7 जुलै (मंगळवार) रोजी खेळवला जाईल. हा सामना नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज मैदानावर होणार आहे.
Comments are closed.