36 चेंडूत शतक, वैभव सूर्यवंशीने इतिहास-भूगोल बदलला; युसुफ पठाणचाही रेकॉर्ड मोडला!

वैभव सूर्यवंशी 36 चेंडूंचे शतक विजय हजारे ट्रॉफी 2025 : वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या तुफानी फटकेबाजीमुळे क्रिकेटविश्वाला थक्क करून सोडलं आहे. अवघ्या 14 वर्षांच्या या युवा फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये बिहारकडून खेळताना पहिल्याच सामन्यात 36 चेंडूंमध्ये शतक झळकावत मोठी खळबळ उडवली आहे.

वैभवने केवळ 36 चेंडूंमध्ये तडाखेबंद शतक ठोकत दिग्गज फलंदाजांच्या खास क्लबमध्ये आपलं नाव कोरलं आहे. नाणेफेक जिंकून बिहारकडून डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि मंगल कुमार महरौर यांनी आक्रमक शैलीत केली. दोघांमध्ये 158 धावांची दमदार सलामीची भागीदारी झाली. या भागीदारीदरम्यान वैभवने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांवर चांगलाच समाचार घेतला अन् आपलं शतक पूर्ण केलं.

इतकंच नाही तर, वैभव सूर्यवंशी हा लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. भारताकडून हा विक्रम अनमोलप्रीत सिंगकडे आहे. अनमोलप्रीतने विजय हजारे ट्रॉफी 2024-25 मध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध पंजाबकडून खेळताना अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं.

भारतीय फलंदाजाकडून सर्वात जलद लिस्ट ए शतके

35 चेंडूत – अनमोलप्रीत सिंग, पीयूजेबी विरुद्ध एआरपी, 2024
36 चेंडूत – वैभव सूर्यवंशी, बीआयएच विरुद्ध एआरपी, 2025
40 चेंडूत – युसूफ पठाण, बीआरडीए विरुद्ध एमएच, 2010
41 चेंडूत – उर्विल पटेल, जीयूजे विरुद्ध एआरपी, 2023
42 चेंडूत – अभिषेक शर्मा, पीयूजेबी विरुद्ध एमपी, 2021

धोनीच्या मैदानावर वैभवचा धमाका

रांचीतील जेएससीए ओव्हल ग्राउंड म्हणजेच महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर वैभवने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 10 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. लिस्ट-ए क्रिकेटमधील हे त्याचं पहिलं शतक आहे. याआधी तो टी-20 क्रिकेटमध्ये तीन झंझावाती शतके ठोकून आपली छाप पाडून गेला आहे.

2025 – वैभवसाठी सुवर्णवर्ष

वैभव सूर्यवंशीसाठी 2025 हे वर्ष अत्यंत संस्मरणीय ठरलं आहे. या वर्षात त्याने आयपीएल, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर युथ टेस्ट, U19 आशिया कप आणि युथ वनडेमध्ये शतके झळकावली आहेत. आणि आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक ठोकत वैभवने आपल्या अफाट प्रतिभेचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे. खरंच, भारतीय क्रिकेटला मिळालेला हा 14 वर्षांचा हिरा भविष्यात किती मोठा चमकणार, याची फक्त झलक आत्ताच पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा –

Ind Squad vs NZ ODI Series : श्रेयस अय्यर कर्णधार, ऋतुराज, यशस्वी IN, शुभमन OUT…; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा असेल टीम इंडियाचा Squad

आणखी वाचा

Comments are closed.