वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास; एकाच वेळी मोडले इतके विक्रम

आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध वैभव सूर्यवंशीने इतकी जबरदस्त फलंदाजी केली की सर्वांना धक्का बसला. आयपीएलमध्ये फक्त तिसराच सामना खेळताना वैभवने एकामागून एक विक्रम मोडले आणि आपले नाव उजळवले. आश्चर्य म्हणजे, वैभवने असे काही विक्रम मोडले जे त्याच्या जन्माआधीच प्रस्थापित झाले होते. काही चेंडूतच त्याने हे सर्व शक्य केले.

वैभव सूर्यवंशीने सर्वात तरुण वयात आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. त्यानंतर फार वेळ न गमावता त्याने सर्वात लहान वयात शतकही पूर्ण केले. एवढ्यावरच न थांबता, वैभव आता आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. मात्र, ख्रिस गेलच्या सर्वात जलद आयपीएल शतकाच्या जागतिक विक्रमाला तो स्पर्श करू शकला नाही.

वैभव सूर्यवंशीने सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या तिसऱ्या सामन्यात त्याने प्रथम फक्त १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर शतक केले. आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात जलद फलंदाज ख्रिस गेल आहे. त्याने फक्त 30 चेंडूत शतक केले. तर वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत शतक केले आहे. त्याने 37 चेंडूत आयपीएल शतक करणाऱ्या युसूफ पठाणचा विक्रम मोडला आहे. डेव्हिड मिलरने 38 चेंडूत आयपीएल शतक केले.

वैभवने केवळ आयपीएलमध्येच नाही तर टी-20 मध्येही सर्वात कमी वयात शतक केले आहे. यापूर्वी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम विजय झोलच्या नावावर होता. महाराष्ट्राकडून खेळताना त्याने 2013 मध्ये 18 वर्षे 118 दिवसांच्या वयात मुंबईविरुद्ध शतक ठोकले होते. पण आता वैभव सूर्यवंशीने 14 वर्षे 32 दिवसांच्या वयात टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकले आहे.

वैभव सूर्यवंशीने या वर्षीच्या आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये अर्धशतक आणि नंतर शतक ठोकले आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून कोणत्याही फलंदाजाने झळकावलेले हे सर्वात जलद शतक आहे, जरी तो अर्धशतकांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता येणाऱ्या सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी कशी कामगिरी करतो हे पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील.

Comments are closed.