IND vs NZ: वैभव सूर्यवंशीसमोर न्यूझीलंडचं आव्हान, सामना कधी आणि कुठे?
भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने नुकत्याच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव करत इतिहास रचला होता. भारतात पहिल्यांदाच एकदिवसीय मालिका जिंकत न्यूझीलंडने मोठी कामगिरी केली. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत टीम इंडियाने जोरदार प्रत्युत्तर देत नागपूरमध्ये पहिला सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, वरिष्ठ संघांमधील या मालिकेचा थरार सुरू असतानाच, अंडर-19 स्तरावरही भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. अंडर-19 टीम इंडियाचा स्टार सलामीवीर वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार असून, त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या झिंबाब्वे आणि नामिबिया येथे सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताने आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यांत यूएसए आणि बांगलादेश संघांचा पराभव करत स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली आहे. आता साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड अंडर-19 संघांमधील हा सामना शनिवारी, 24 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना झिंबाब्वेतील बुलावायो शहरातील क्विन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर होणार आहे.
या सामन्याला दुपारी 1 वाजता सुरुवात होईल, तर 12.30 वाजता नाणेफेक पार पडणार आहे. अंडर-19 विश्वचषकातील हा सामना भारतीय वेळेनुसार होणार असून, क्रिकेटप्रेमींसाठी मोठा उत्साह असणार आहे.
हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. तसेच, मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांना जिओहॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
दरम्यान, अंडर-19 संघाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बांगलादेशविरुद्धच्या मागील सामन्यात त्याने 67 चेंडूत 72 धावांची संयमी पण प्रभावी खेळी केली होती. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले होते.
याशिवाय, वैभवने याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंडर-19 युवा एकदिवसीय मालिकेत 127 धावांची शानदार खेळी साकारली होती. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वैभवची कामगिरी कशी असते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Comments are closed.