वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली; 52 चेंडूंमध्येच ठोकलं शतक

वैभव सूर्यवंशीने आपली तोडफोड फटकेबाजी कायम ठेवली आहे. IPL मद्ये धुमशान घातल्यानंतर वैभव आता इंग्लंडमध्ये इंग्लंडच्याच गोलंदाजांची शाळा घेताना दिसत आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्या 19 वर्षांखालील संघामध्ये सध्या पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात वैभवच वादळ गोंगावलं आणि त्याने 52 चेंडूंमध्येच शतक ठोकलं.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये शनिवारी (5 जुलै 2025) वॉर्सेस्टर येथे सामना सुरू आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाला पहिला धक्का 14 या धावसंख्येवर कर्णधार आयुष म्हात्रेच्या स्वरुपात बसला. परंतु त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्रा यांनी चौफेर फटकेबाजी करत टीम इंडियाला 200 च्या पार नेलं. वैभव सूर्यवंशीने 78 चेंडूंमध्येच 10 षटकार आणि 13 चौकार मारत 143 धावा चोपून काढल्या. तसेच विहान मल्होत्राने 121 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि 3 षटकार मारत 129 धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या दमदार फटकेबाजीमुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 363 धावांचा डोंगर इंग्लंडसमोर उभा केला आहे. वैभव सूर्यवंशी अंडर-19 वनेडमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा हिंदुस्थानी खेळाडू आहे. या मालिकेत वैभवची फलंदाजी आतापर्यंत दमदार राहिली आहे. त्याने पहिल्या सामन्यात 48, दुसऱ्या सामन्यात 45, तिसऱ्या सामन्यात 86 आणि चौथ्या सामन्यात 143 धावा केल्या आहेत.

Comments are closed.