रेकॉर्ड मशीन वैभव! विराट पाठोपाठ आता शुबमन गिलला पछाडण्याची संधी
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अंडर-19 टीम इंडियाने वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी करत आपली दावेदारी भक्कम केली आहे. साखळी फेरीतील पहिले दोन सामने जिंकत भारताने थेट पुढील फेरीत प्रवेश केला असून, बी ग्रुपमधील इतर संघांवर वर्चस्व गाजवले आहे. अमेरिका (USA) आणि बांगलादेश या दोन्ही संघांना भारताने पराभवाची चव चाखायला लावली, विशेष म्हणजे हे दोन्ही विजय डीएलएस (DLS) नियमानुसार मिळाले.
15 जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात भारताने यूएसएवर 6 विकेट्सने सहज विजय मिळवला. त्यानंतर 17 जानेवारीला बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यातही भारतीय संघाने आपली ताकद दाखवून 18 धावांनी सामना जिंकला. दोन्ही लढतींमध्ये पावसामुळे दुसऱ्या डावात व्यत्यय आला, मात्र भारतीय खेळाडूंनी परिस्थितीशी जुळवून घेत अचूक खेळ करत विजय मिळवला.
या यशामागे भारताचा युवा स्टार ओपनर वैभव सूर्यवंशी विशेष आकर्षण ठरला. यूएसएविरुद्धच्या सामन्यात अपयश आल्यानंतर वैभवने बांगलादेशविरुद्ध जोरदार पुनरागमन करत 72 धावांची शानदार खेळी केली. या खेळीने केवळ भारताला मजबूत स्थितीत नेले नाही, तर वैभवने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.
या 72 धावांच्या खेळीसह वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीचा युथ वनडे (लिस्ट ए) क्रिकेटमधील एक महत्त्वाचा विक्रम मोडीत काढला. अंडर-19 वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत आता वैभवने मोठी झेप घेतली आहे. सध्या वैभवच्या नावावर 20 सामन्यांत 3 शतकांसह 1047 धावा आहेत.
मात्र आता त्याच्या निशाण्यावर शुबमन गिलचा मोठा विक्रम आहे. गिलने अंडर-19 वनडेत 16 सामन्यांत 1149 धावा करत सर्वोच्च स्थान पटकावले आहे. वैभवला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 103 धावांची गरज असून, न्यूझीलंडविरुद्धचा साखळी सामना किंवा बाद फेरीतील एखादी लढत त्याच्यासाठी ऐतिहासिक ठरू शकते.
दरम्यान, बी ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी आहे. भारताने सलग दोन सामने जिंकत 4 गुण मिळवले असून अजूनही अपराजित आहे. याउलट यूएसए, न्यूझीलंड आणि बांगलादेश या तिन्ही संघांना अद्याप विजयाचा आनंद घेता आलेला नाही. या घोडदौडीमुळे अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारत पुन्हा एकदा किताबाचा प्रबळ दावेदार ठरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
Comments are closed.