वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग, 'गेम चेंजर' विकास
कोणत्याही भागाचा विकास व्हायचा असेल, तर त्या भागात दळणवळणाच्या चांगल्या सुविधा असणे आवश्यक आहे. परंतु काही वर्षांपूर्वी कोकणात दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे कोकण विकासाबाबत मागे राहिला होता. मात्र, कोकण रेल्वे प्रकल्पामुळे कोकणात दळणवळणाची सुविधा सुरू झाली. तेव्हा कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने मोठी चालना मिळाली. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे कामही पूर्णत्वास जात आहे. त्यानंतर आता बंदरे विकासाच्या निमित्ताने राज्याचे बंदर व मत्स्योद्योगमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर एक दशकापासून मंजूर असलेला वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग उभारणीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात उतरुन कोकण विकासाचे नवे दालन उघडले जाणार आहे. याचा फायदा कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रालाही होणार आहे.
कोकणची जनता नोकरीच्या निमित्ताने थेट मुंबईशी कनेक्ट असली, तरी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने मात्र पश्चिम महाराष्ट्राशी कनेक्ट आहे. आजची परिस्थिती पाहिल्यास सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आयात होणारे सर्व प्रकारचे धान्य, दूध, भाजीपाला व इतर सर्वच वस्तू या कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा बेळगाव येथून येत असतात. परंतु या पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा चांगल्या नाहीत. वळणावळणाचे घाट मार्ग आहेत. त्यामुळे नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी कोकणवासीय आणि पश्चिम महाराष्ट्राची जनता सातत्याने मागणी करत होती. या मागणीची दखल घेत कोकणचे सुपुत्र, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या मंजुरीची घोषणा करत 26 फेब्रुवारी 2016 रोजी 3244 कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. त्यापैकी केंद्र शासनाच्या हिश्श्याची 1375 कोटी रुपयांची तरतूदही केली होती. मात्र, पुढे जाऊन राज्य शासनाने आपल्या हिश्श्याची तरतूद केली नाही. किंवा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या नाहीत. त्यामुळे गेली 10 वर्षे या रेल्वे मार्गाची प्रतीक्षा होती.
वैभववाडी-कोल्हापूर मार्ग सुरू होण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, कोकणचे सुपुत्र आमदार नीतेश राणे बंदर व मत्स्योद्योगमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिघ्र गतीने त्यांनी पाठपुरावा केला आणि त्याला यावेळच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मोठे यश मिळाले आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधान भवनातील मंत्री परिषदेच्या सभागृहात बंदरे विकास विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत कोकणातील जयगड, आंग्रे, रेडी व विजयदुर्ग या बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाची गरज आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून उभारला जाणार आहे. याकरिता या मार्गासाठी राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाची तरतूदही करा आणि या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची कार्यवाही सुरू करा’, असे निर्देश दिले. त्यामुळे गेल्या एक दशकापासून प्रतीक्षेत असलेल्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागून लवकरात लवकर या रेल्वे मार्गाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग हा ज्यावेळी प्रस्तावित करण्यात आला आणि त्यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली. त्यावेळी 3244 कोटी खर्च अपेक्षित होता, मात्र आता तो 5 हजार कोटीपर्यंत जाणार आहे. निसर्गाच्या कुशीतून जाणारा हा रेल्वे मार्ग 107.65 किमी लांबीचा असणार आहे. त्यासाठी 638.6 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. या रेल्वे मार्गावर 28 किमी लांबीचे एकूण 27 बोगदे असतील. यासह रस्त्यावर 55 उ•ाण पूल आहेत. सर्वात मोठा बोगदा 3.96 लांबीचा आहे. 2 किमीपेक्षा जास्त लांबीचे 3 तर त्या पेक्षा कमी लांबीचे 24 बोगदे असणार आहेत. 55 उ•ाण पुलांच्या रस्त्याखाली 68 पूल असतील, यासह छोटे 74 पूल असणार आहेत आणि या मार्गावर एकूण 10 स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे हा वैभववाडी-कोल्हापूर मार्ग खर्चिक असला, तरी किंवा या प्रकल्पासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार असली, तरी हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या विकासासाठी मोठी उपलब्धी असणार आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांना बंदर व मत्स्योद्योग खाते मिळाल्यानंतर या खात्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. गेल्या वर्षभरात या खात्याच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या खात्याला न्याय देत असतानाच कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाच्या विजयदुर्ग, रेडी, आंग्रे आणि जयगड या बंदरांचा विकास व्हावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. या बंदरांच्या विकासासाठी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग झाल्यास बंदर विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळू शकते, याकडे मुख्यमंत्र्यांचे सातत्याने लक्ष वेधून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्ग उभारण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर मंत्री नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग सुरू होणे हा एक कोकणच्या विकासाचा नव्हे, तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणार आहे, असे म्हटले होते. निश्चितच ते योग्य असून त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले यश कौतुकास्पद आहे.
वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वे मार्गामुळे विकासाची अनेक दालने उघडणार आहेत. प्रामुख्याने कृषी आणि मत्स्य उत्पादनाच्या वाहतुकीला चालना मिळणार आहे. पर्यटनातही मोठी वाढ होणार असून पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक व इतर प्रवाशांना मोठी दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. भूस्खलनाच्या काळात दळणवळणाची पर्यायी सुविधा म्हणून हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. या मार्गामुळे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. दळणवळणाच्या सुविधांमुळे कोकणात वेगवेगळे प्रकल्प येऊ लागतील आणि रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. त्यामुळे कोकणातील तरुण नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबई-पुण्याकडे जायचे ते कोकणातच थांबतील.
कोकणातील जनता ही गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या निमित्ताने मुंबईशी कनेक्ट झालेली आहे. प्रत्येक कुटुंबातील एक-दोन व्यक्ती नोकरीच्या निमित्ताने मुंबई किंवा पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या पाहिली, तर मर्यादित आहे. त्याचे कारण हेच आहे की, कोकणात रोजगार उपलब्ध नाहीत, रोजगार निर्माण करुन देण्यासाठी प्रकल्प नाहीत परंतु हे प्रकल्प न येण्यामागे सुद्धा याठिकाणी चांगल्या दळणवळणाच्या सुविधा नाहीत हे प्रमुख कारण आहे. मात्र, कोकण रेल्वे मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण या दळणवळणाच्या सुविधांमुळे कोकणात आता हळूहळू रोजगार निर्मितीचे पाऊल पडू लागले आहे. कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागले आहेत. त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्राशी कनेक्ट होऊ शकणारा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातीलही लोक कोकणात उद्योग व्यवसायाबरोबरच पर्यटनासाठीही मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यामुळे कोकणच्या विकासाला मोठी चालना या एका रेल्वे मार्गामुळे मिळणार आहे.
वैभववाडी-कोल्हापूर मार्ग उभारणीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून भूसंपादनाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निश्चितच हा रेल्वे मार्ग पुढील काही वर्षांत होईल, यात शंका नाही. असे असले, तरी राज्याची आर्थिक परिस्थिती किंवा अन्य काही अडचणी निर्माण होऊन या मार्गामध्ये अडथळे निर्माण झाल्यास ते दूर करण्यासाठी मात्र सातत्याने पाठपुरावा होणे आवश्यक आहे. त्यासाठी कोकणवासीयांबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील जनतेनेही हा रेल्वे मार्ग होण्यासाठी पाठपुरावा करायला हवा. बंदरे व मत्स्योद्योगमंत्री नीतेश राणे बंदर विकासाच्या निमित्ताने का होईना हा रेल्वे मार्ग होण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत निश्चितच कौतूकास्पद असून आता त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे टाईमबाऊंड प्रद्धतीने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करायला हवेत, तरच गेल्या एक दशकापासून प्रतीक्षेत असलेला कोकणी आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेची वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरेल आणि कोकणी जनतेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून दरडोई उत्पन्न साडेचार लाखापर्यंत नेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
संदीप गावडे
Comments are closed.