वैशालीला फिडे विमेन्स ग्रॅण्ड स्विस किताब

हिंदुस्थानची बुद्धिबळपटू वैशाली रमेशबाबू हिने फिडे विमेन्स ग्रॅण्ड स्विस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या विजयासह तिने पुढील वर्षी होणाऱ्या फिडे विमेन्स कँडिडेट्स स्पर्धेचे तिकीटही मिळवले आहे. पुरुष विभागात हा किताब नेदरलँड्सच्या अनीश गिरी याने जिंकला.
वैशालीने युव्रेनच्या मारिया मुजिचुकचा पराभव करून 7.5 गुणांसह संयुक्त आघाडी घेतली होती. त्यानंतर चीनच्या तान झोंगयीविरुद्ध ड्रॉ खेळून तिने किताबावर शिक्कामोर्तब केले. 24 वर्षीय वैशालीने सलग दुसऱयांदा फिडे विमेन्स ग्रॅण्ड स्विसचे विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केलाय. वैशाली ही फिडे विमेन्स कँडिडेट्स 2026 साठी पात्र ठरणारी तिसरी हिंदुस्थानी महिला बुद्धिबळपटू ठरली. याआधी दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांनी या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती.
आनंदकडून वैशालीचे अभिनंदन
वैशालीच्या या यशाबद्दल माजी विश्वविजेता सुपर ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने सोशल मीडियावरून तिचे अभिनंदन केले. ‘अप्रतिम कामगिरीबद्दल अभिनंदन. वैशालीला जागतिक किताबासाठी संधी मिळावी यासाठी आम्ही मार्गदर्शन केले, याचा आम्हाला अभिमान आहे. तिची जिद्द आणि मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. फिडे ग्रँड स्विस दोनदा जिंकणे ही फार कमी खेळाडूंनी केलेला पराक्रम आहे.
Comments are closed.