दडपण न घेता खेळल्याचा फायदा झाला – वैष्णवी आडकर

‘स्पर्धेपूर्वीचा क्ले कोर्टवरील उत्तम सराव आणि स्पर्धेत दडपण न घेता नैसर्गिक खेळल्याचा फायदा झाला. त्यामुळेच मी जर्मनीत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत कांस्यपदक जिंकू शकले,’ अशा शब्दांत पुण्याची टेनिसपटू वैष्णवी आडकर हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. 20 वर्षीय मराठमोळी वैष्णवी ही अशी कामगिरी करणारी पहिली महिला टेनिसपटू ठरली, हे विशेष!
वैष्णवी आडकरच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या वतीने वैष्णवीचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. तिला 25 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. वैष्णवीला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्लोव्हाकियाच्या एस्झ्टर मेरीकडून 6-2, 4-6, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी 1979 मध्ये मेक्सिको सिटीत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत नंदन बाळ यांनी पुरुष एकेरीत रौप्यपदक मिळविले होते.
Comments are closed.