रविवारीपासून पुन्हा सुरू होईल

यात्रामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण : भाविकांना बोर्डाचे आवाहन

वृत्तसंस्था/ जम्मू

प्रतिकूल हवामान आणि मार्गाच्या दुरुस्तीकार्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आलेली श्री माता वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू होणर आहे. पर्वतीय भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर यात्रामार्गावर भूस्खलन होत अनेक भाविकांना जीव गमवावा लागला होता. आता हवामान अनुकूल झाले असून यात्रामार्गाची दुरुस्ती करण्यात आल्याने रविवारपासून पुन्हा यात्रा सुरू होणार आहे. तर हवामान पुन्हा प्रतिकूल झाल्यास श्राइन बोर्ड पुढील निर्णय घेणार आहे.

भाविकांची सुरक्षा आणि सुविधा विचारात घेत काही दिवसांपूर्वी यात्रा रोखावी लागली होती. यात्रामार्गावरील दुरुस्ती आणि देखभालीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यात्रेवर निघण्यापूर्वी भाविकांनी हवामानाची स्थिती आणि बोर्डाच्या नव्या मार्गदर्शन सूचना अवश्य पहाव्यात असे आवाहन श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने शुक्रवारी केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात कटरा येथून श्री माता वैष्णोदेवी यात्रा 26 ऑगस्टपासून स्थगित आहे. तीर्थयात्रा मार्गावर भूस्खलनाची घटना घडली होती. अर्धकुंवारी येथील इंद्र्रप्रस्थ भोजनालयानजीक अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनात 34 जणांना जीव गमवावा लागला होता. मृतांमध्ये भाविकांचे प्रमाण अधिक होते.

22 सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होणार असल्याने श्राइन बोर्डाने यात्रा पुन्हा सुरू करण्यासंबंधी स्थिती स्पष्ट करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. तर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि श्रीमाता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा यांनी 26 ऑगस्ट रोजी झालेल्या भूस्खलनाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. जम्मू-काश्मीर जलशक्ती विभागाचे अतिरिक्त सचिव शालीन काबरा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत विभागीय आयुक्त रमेश कुमार आणि जम्मूचे पोलीस महानिरीक्षक बी.एस. टूटी सामील आहेत. ही समिती दोन आठवड्यांच्या आत उपराज्यपाल मनोज सिन्हा ांना एक व्यापक अहवाल सोपविणार आहे.

Comments are closed.