गुवाहाटी-कोलकाता मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन
नववर्षात रेल्वेची भेट : दीर्घ पल्ल्याचा प्रवास सुखद
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय रेल्वेप्रवाशांसाठी नवे वर्ष खूशखबर घेऊन आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशाची पहिली वंदे भारत स्लीपर रेल्वे चालू महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. ही रेल्वे दीर्घ अंतराच्या रात्रकालीन प्रवासासाठी विशेष स्वरुपात डिझाइन करण्यात आली असून ही पूर्णपणे वातानुकूलित असेल. वंदे भारत स्लीपर रेल्वेचा पहिला संच पूर्णपणे तयार असून यशस्वी परीक्षणानंतर आता ती प्रवाशांसाठी उतरविण्याची तयारी पूर्ण झाल्याचे वैष्णव यांनी सांगितले आहे. पहिली वंदे भारत स्लीपर रेल्वे गुवाहाटी आणि कोलकाता या शहरांदरम्यान धावणार आहे. हा मार्ग ईशान्य भारताला उत्तम संपर्कव्यवस्था प्रदान करणार आहे. रेल्वेत एकूण 16 डबे असतील, ज्यातील 11 एसी थ्री-टियर, 4 एसी टू-टियर आणि 1 एसी फर्स्ट क्लास कोच सामील आहे. या स्लीपर रेल्वेत एकूण प्रवासी क्षमता 823 इतकी असणार आहे.
8 स्लीपर वंदे भारतची भर
पुढील 6 महिन्यांमध्ये आणखी 8 वंदे भारत स्लीपर रेल्वे उपलब्ध होणार आहेत. अशाप्रकारे चालू वर्षाच्या अखेरीस या वंदे भारत स्लीपर रेल्वेगाड्यांची संख्या वाढून 12 होणार आहे. भविष्यात भारतीय रेल्वेची योजना देशभरात 200 हून अधिक वंदे भारत स्लीपर रेल्वेगाड्या चालविण्याची आहे, ज्यामुळे दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात मोठा बदल घडून येणार आहे.
180 किमी प्रतितासाचा वेग
या विशेष रेल्वेचा वेग 180 किलोमीटर प्रतितास इतका आहे आणि अलिकडेच कोटा-नागदा सेक्शनवर वंदे भारत स्लीपर रेल्वेचे यशस्वी हाय-स्पीड परीक्षण पार पडले आहे. रेल्वेमंत्र्यांनी अलिकडेच सोशल मीडियावर परीक्षणाचा व्हिडिओ शेअर केला होता. कोटा-नागदा सेक्शनवर करण्यात आलेल्या परीक्षणादरम्यान रेल्वेने 180 किलोमीटर प्रतितास इतका वेग प्राप्त केला होता. खास बाब म्हणजे रेल्वेची स्थिरता दाखविण्यासाठी करण्यात आलेल्या ‘वॉटर टेस्ट’मध्ये 180 किमी प्रतितासाच्या वेगावरही पाण्याने भरलेला ग्लास अजिबात हललेला नाही तसेच पाणी बाहेर पडले नाही.
सुविधांमध्ये होणार मोठा अपग्रेड
युरोपीय रेल्वे डिझाइनने प्रेरित वंदे भारत स्लीपर रेल्वेंमध्ये प्रवाशांच्या आराम आणि सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. डब्यांमध्ये कुशनयुक्त स्लीपिंग बर्थ, वरच्या बर्थपर्यंत सहजपणे पोहोचता येणे, नाइट लाइटिंग, पब्लिक अॅड्रेस सिस्टीमसोबत व्हिज्युअल डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मॉड्यूल पँट्री यासारख्या सुविधा असतील. याचबरोबर विमानांच्या धर्तीवर अॅडव्हान्स बायो-व्हॅक्यूम टॉयलेंट, दिव्यांग प्रवाशांच्या अनुकूल शौचालय, बेबी केयर एरिया आणि एसी फर्स्ट क्लास कोचमध्ये गरम पाण्यासोबत शॉवरची सुविधाही दिली जाणार आहे. रेल्वेत स्वदेशी कवच अँटी-कोलिजन सिस्टीम, रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग, सील्ड गँगवे आणि ऑटोमॅटिक इंटर-कोच डोर्स लावण्यात आले आहेत. प्रत्येक कोचमध्ये रीडिंग लाइट, चार्जिंग पॉइंट, फोल्डेबल स्नॅक टेबल आणि इमर्जन्सीत थेट लोको पायलटशी संपर्काची सुविधा असणार आहे.
प्रवासभाडे किती असणार
वंदे भारत स्लीपर रेल्वेचे प्रवासभाडे किफायतशीर ठेवण्यात आले आहे. हा खर्च विमानप्रवासापेक्षा खूपच स्वस्त आहे. गुवाहाटी-कोलकाता मार्गावर एकतर्फी प्रवासाचा अनुमानित खर्च असा असणार आहे…
- थर्ड एसी (एसी3 टियर) : जवळपास 2300 रुपये
- सेकंड एसी (एसी2 टियर) : जवळपास 3000 रुपये
- फर्स्ट एसी (एसी फर्स्ट क्लास) : जवळपास 3600 रुपये
Comments are closed.