राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' लावले जाते
गायन आणि शिष्टाचारांच्या संदर्भात नवे नियम लागू : सर्व शाळा, प्रशासकीय कार्यक्रमांमध्ये त्वरित अंमलबजावणीचे निर्देश
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय गृह विभागाने ‘वंदे मातरम्’ या भारताच्या राष्ट्रगानासंबंधी नवी नियमावली लागू केली आहे. या नियमावलीनुसार शाळा आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन ‘जन गण मन’च्या आधी केले जाणार आहे. तसेच या राष्ट्रगानाचे सर्व सहा चरण किंवा सर्व सहा कडवी गायली जाणार आहेत. हे नियम सर्व शाळा आणि प्रशासकीय कार्यक्रम यांच्यासाठी त्वरित लागू करण्यात आलेले आहेत.
‘वंदे मातरम्’ कशा प्रकारे गायले जावे, कुठे आणि केव्हा गायले जावे, तसेच ते गायले किंवा वाजविले जात असताना उपस्थितांनी कशा प्रकारे या गीताला सन्मान द्यावा, यासंबंधीचे हे नियम आणि शिष्टाचार आहेत. या राष्ट्रगानाचे सर्व सहा चरण गायले जावेत, हा सर्वात प्रथम आणि सर्वात महत्वाचा नियम करण्यात आला आहे. काँग्रेसच्या शासनकाळात या राष्ट्रगानाचे केवळ पहिले दोन चरणच गाण्याचा नियम होता. उर्वरित चार चरण वगळण्यात आले होते. तथापि, आता हा नियमच वगळण्यात आला असून त्याचे स्थान या नव्या नियमांकडून घेण्यात आले आहे.
कोठे, कसे गायले जावे…
संपूर्ण ‘वंदे मातरम्’, यापुढे संपूर्ण देशात, सर्व प्रशासकीय समारंभांमध्ये, तसेच शाळा आणि संस्थांमध्ये गायले जाण्याचा नियम करण्यात आला आहे. तसेच हे गीत गायले जात असताना, या कार्यक्रमांना उपस्थित असणाऱ्या सर्वांनी गीताचे गायन पूर्ण होईपर्यंत उभे राहण्याचा नियम करण्यात आला आहे. ज्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ या दोन्ही गीतांचे गायन होणार असेल, तर प्रथम ‘वंदे मातरम्’चे गायन व्हावे आणि नंतर ‘जन गण मन’ गायले जावे, असाही नियम करण्यात आला आहे. मात्र, उभे राहण्याचा नियम चित्रपटगृहांना लागू करण्यात आलेला नाही, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
हे नियम आत्ताच का…
इसवी सन 1875 मध्ये विख्यात बंगाली कवी, लेखक आणि कार्यकर्ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत रचले. 1950 मध्ये काँग्रेसने या गीताचा स्वीकार ‘राष्ट्रगान’ म्हणून केला. मात्र, अल्पसंख्याकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून या गीताचे केवळ पहिले दोन चरण स्वीकारण्यात आले. उर्वरित 4 चरण नाकारण्यात आले. यंदाचे वर्ष हे या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवपूर्तीचे वर्ष आहे. त्यामुळे, भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा महामंत्र असलेल्या या संपूर्ण गीताचा यथोचित सन्मान होण्यासाठी हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन सर्व संबंधितांना गंभीरपणे करावे लागेल, असे स्पष्ट केले गेले.
दृष्टिक्षेपात नवे नियम…
- ‘वंदे मातरम्’ या प्रेरणादायी राष्ट्रगानाचे सर्व सहा चरण गायले जावेत. हे राष्ट्रगान गायन साधारणत: 3 मिनिटे 10 सेंकद इतक्या समयसीमेमध्ये व्हावे.
- कोणत्याही कार्यक्रमात जर ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ ही दोन्ही गीते गायली जाणार असतील, तर ‘वंदे मातरम’चे गायन आधी करण्यात यावे.
- ‘वंदे मातरम्’ गायले जात असताना अशा कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांनी गीतगायन पूर्ण होईपर्यंत उठून उभे राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- संपूर्ण भारतातील शाळांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आणि संमेलनांमध्ये ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाचा समावेश केला जावा. राष्ट्रीय मानचिन्हाचा सन्मान व्हावा.
- ‘वंदे मातरम्’ हे गीत प्रशासकीय कार्यक्रम, नागरी पुरस्कार वितरण समारंभ, ध्वजवंदन समारंभ, तसेच राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या कार्यक्रमात वाजवावे.
- हे नियम त्वरित लागू करण्यात आले आहेत. प्रशासकीय कार्यक्रम, शाळांची संमेलने आणि महत्वाच्या सार्वजनिक कार्यकमांमध्ये हे गीत गायले गेले पाहिजे.
- चित्रपटगृहांमध्ये हे गीत लावण्याची आवश्यकता नाही. तसेच चित्रपट किंवा बोधपट यांच्यात हे गीत असेल, तर ते लागल्यानंतर उभे राहणे अनिवार्य नाही.
Comments are closed.