बोलीभाषेची समृद्धी- बाणकोटी बोली

>> वर्णिका काकडे

बाणकोटी ही महाराष्ट्रातील कोकण पट्टय़ातील (रायगड व रत्नागिरी जिल्हा) एक प्रमुख ग्रामीण बोलीभाषा आहे, जी आगरी आणि मराठीच्या मिश्रणातून बनली आहे. मंडणगड, दापोली, खेड ते चिपळूण आणि मुरुड-माणगाव भागात (आगरी, कोळी, मराठा) ही राकट, पण गोड बोली बोलली जाते.

एका बाजूला ही भाषा आगरी बोलीच्या खूप जवळची आहे, ज्यात अनेक शब्द आणि म्हणी सारख्याच आहेत. ही भाषा बोलणाऱया व्यक्तीच्या बोलण्यात म्हणींचा वापर सर्रास आढळतो. बाणकोटी बोली ही भाषा आगरी बोली व मराठी भाषा यांच्या संगमातून तयार झाली आहे आगरी व बाणकोटीबोलींतील अनेक शब्दप्रयोग व बोलण्याचा सूर तसेच म्हणी सारख्याच स्वरूपाच्या आहेत. दोन्ही बोलींत ‘ळ’ अक्षरासाठी ‘ल’, ‘मला’ शब्दासाठी ‘मना’, करतो, देतो या शब्दांसाठी करतांव, देतांव हे शब्द वापरले जातात.

साधारणपणे अलिबाग, पेण, रोहा, खालापूर, मुरुड या भागांत ‘आगरी’ व ‘बाणकोटी’ या दोन्ही बोली सारख्याच प्रमाणात बोलल्या जातात. आगरी-बाणकोटी या बोली बोलणारे लोक हे आगरी, कोळी, गवळी, क्षत्रिय मराठा, कुणबी या समाजातले असतात त्याप्रमाणे इतर जातिप्रवर्गातील तसेच जमातीतील काही लोक ही बोली बोलतात.

आदरार्थी संबोधनांच्या क्रियापदांना काहीसे वेगळे रूप देऊन किंचित सानुनासिक उच्चारात लोक ही बोली बोलताना आढळतात. जसे की- तुमचं नाव काय – तुमचां नांव काय, मला काय माहीत – मना काय/कय म्हाईत? ती मला जेवायला देते – ती मना ज्येवयला देते, या झाडाखाली बस – हे झाडाखाली बस.

बाणकोटी बोलीत शेवटचा शब्द अगदी ताणून बोलला जातो. त्यामुळे ऐकताना ही बोली काहीशी विनोदी वाटते. म्हणूनच हल्ली विनोदनिर्मितीसाठी अनेक कार्यक्रम व सादरीकरणात या भाषेचा वापर होतो. मालवणीच्या जवळ जाणारी ही बोली असेही म्हटले जाते. आगरी व कोळी समाजाची वस्ती असणाऱया भागात हमखास ही बोली ऐकू येते. रत्नागिरी जिह्यातही बरेच भागात ही बोली बोलली जाते. विशेषत खोत मराठा समाज आणि कुणबी समाजाच्या बाणकोटी बोलीत फरक आढळतो. राजापूर तालुक्यातील पठारी प्रदेशातील लोक बाणकोटी बोलीत ‘तुम्हास’, आम्हास असा वेगळा प्रयोग करीत हेल काढीत बोलतात. आजही मालवणी आणि बाणकोटी बोलीत बोलणाऱयांची संख्या जास्त आढळते.

Comments are closed.