100 उठाबशा काढल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, वसईतील शिक्षिकेला अटक

100 उठाबशा काढल्याने वसईच्या श्री हनुमंत विद्या मंदिरातील आशिका गौड या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. उठाबशा काढण्याची क्रूर शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. ममता यादव असे या शिक्षिकेचे नाव असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे.

शाळेत यायला 10 मिनिटे उशीर झाला म्हणून सहावी अ वर्गातील विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तर घेऊन 100 उठाबशा काढण्याची शिक्षा ममता यादव यांनी दिली होती. त्यात आशिका हीदेखील होती. शाळेतून घरी परतल्यावर तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने वसईतील आस्था रुग्णालयात दाखल केले. पण तिची प्रकृती अधिकच खालावल्याने आशिकाला मुंबईतील जे जे रुग्णालयात हलवावे लागले. अखेर रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

कठोर कारवाई करा !

आशिकाचे वडील सिकंदर गौड यांनी वालीव पोलीस ठाण्यात शिक्षिकेच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर तब्बल पाच दिवसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आता अघोरी शिक्षा देणारी शिक्षिका ममता यादव हिला अटक केली आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी हनुमान विद्या मंदिरावर धडक देऊन शाळेला टाळेदेखील ठोकले होते. तसेच निर्दयी शिक्षिकेला कडक शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर यांनी गौड कुटुंबाची भेट घेतली. तसेच पालकांचे सांत्वन केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन केली असल्याची माहिती मातेकर यांनी दिली. या समितीत उपशिक्षण अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, महिला विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांचा समावेश आहे.

Comments are closed.