Video : MG ZS EV कारची ऑटोमॅटिक सिस्टीम फेल; वसईतील डॉक्टर दाम्पत्याचा थरारक अनुभव

वासई कार अपघात वसई: वसईतील सन सिटी येथील वीरचंदानी बिल्डिंगमध्ये शनिवारी सायंकाळी एक गंभीर अपघात टळलाय. डॉक्टर मिथिलेश मिश्रा आणि त्यांच्या पत्नीवर थरारक प्रसंग ओढवला, जेव्हा त्यांच्या नव्याकोऱ्या MG ZS EV या फुल्ली ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक गाडीची सिस्टीम अचानक फेल झाली आणि गाडी पलटी झाली. विशेष बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी गाडीत एकही एअरबॅग उघडली नाही आणि दरवाजे लॉक झाल्याने दोघेही गाडीत अडकले होते. मात्र सुदैवाने त्यात कोणतीही जखम त्यांना झाली नाही.

पुढे आलेल्या माहितीनुसार, शनिवारी डिनरसाठी घराबाहेर पडण्यासाठी डॉक्टर मिश्रा आणि त्यांची पत्नी गाडीत बसले. अवघ्या महिनाभरापूर्वी घेतलेली MG ZS EV कार त्यांनी सुरू केली आणि ड्रायव्हिंग मोडमध्ये टाकली. मात्र, ब्रेक रिलीज होत नव्हता, त्यामुळे गाडी पुढे सरकत नव्हती. गाडीतून न्यूट्रल आणि ड्रायव्हिंग मोडमध्ये फेरबदल करत असताना गाडी अचानक वेगाने सुरू झाली. यावेळी गाडीसमोर एक व्यक्ती उभा असल्याने त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर मिश्रा यांनी गाडी डावीकडे वळवली.

अपघातानंतर एअरबॅगसह कोणतेही सेफ्टी फिचर्स सुरू झालेच नाहीत

मात्र समोरच सोसायटीच्या फायर सेफ्टी पाइपशी गाडी धडकली आणि थेट पलटी झाली. धडक देताच गाडीचे सर्व दरवाजे लॉक झाले आणि एअरबॅगसह कोणतेही सेफ्टी फिचर्स सुरू झाले नाहीत. या अपघातानंतर गाडीतील कोणतीही सेफ्टी सिस्टम – जसे की ऑटो ब्रेक, एअरबॅग किंवा इमर्जन्सी अलर्ट, सक्रिय झाली नाही. गाडीत अडकलेले डॉक्टर दांपत्य सुमारे काही मिनिटे मदतीची वाट पाहत होते. अखेर सोसायटीतील स्थानिकांनी प्रसंगावधान राखत गाडीची सनरूफ फोडून त्यांना बाहेर काढले.

ग्राहकांच्या जीवाशी असा खेळ नको- डॅा. मिथिलेश मिश्रा

या धक्कादायक घटनेनंतर डॉक्टर मिथिलेश मिश्रा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “अशी महागडी आणि सेफ्टी फिचर्सने युक्त असल्याचा दावा करणारी कार जर एवढा मोठा धोका निर्माण करू शकते, तर रस्त्यावर चालवताना किती मोठा अनर्थ घडू शकतो याची कल्पनाही करवत नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी MG मोटर्स कंपनीकडे आणि संबंधित यंत्रणांकडे प्रश्न उपस्थित करत सांगितले की, “गाडी रस्त्यावर उतरवण्याआधी तिची संपूर्ण तपासणी झाली पाहिजे. ग्राहकांच्या जीवाशी असा खेळ नको.” असे डॅा. मिथिलेश मिश्रा म्हणालेत. मात्र या घटनेमुळे MG ZS EV सारख्या महागड्या आणि नावाजलेल्या गाड्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या असून, संबंधित कंपनीने याचे गांभीर्याने स्पष्टीकरण देणे आवश्यक झाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=5x6vaig1d0o

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.