देवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर अत्याचार, वसईच्या भामट्या धर्मगुरूविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

“मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस,” असे भासवून एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना पुण्यात घडली असल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?
पुण्यात राहणाऱ्या 35 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 2023 मध्ये तिची ओळख ‘आमची वसई’ या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली होती. वैद्य याने महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत ‘अध्यात्म’ शिकवण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक साधली. डिसेंबर 2023 मध्ये तो पीडित महिलेला भेटायला पुण्याला गेला. तिथे “मी महादेवाचा अवतार आहे आणि तू माझी पार्वती आहेस,” असे सांगून त्याने तिला भुलवले. त्यानंतर पुण्यातील मांजरी परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन, तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. या दरम्यान त्याने तिची अश्लील छायाचित्रेही काढली. याच फोटोंच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून मे 2025 मध्ये वसईतील ‘हॉटेल एक्सप्रेस इन’ येथे पुन्हा बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

पतीच्या मदतीने दिली तक्रार
नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण समोर आल्यानंतर, पीडित महिलेने धीर एकवटून सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी दोघांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना पुण्यात घडली असल्याने हे प्रकरण हडपसर पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. ऋषिकेश वैद्य याने स्वतःला धर्मगुरू भासवून अनेक मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.

माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ऋषिकेश वैद्य फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या वसईतील निवासस्थानी धाड टाकली, मात्र तो तिथे मिळून आला नाही. दुसरीकडे, ऋषिकेश वैद्य याने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. “माझ्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा असून लवकरच सत्य समोर येईल; सत्यमेव जयते,” असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

सध्या पुणे आणि वसई पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण वसई-विरार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Comments are closed.