वसईत दोन विद्यार्थिनींच्या अपहरणाचा डाव फसला; बोगस तृतीयपंथियांना नागरिकांनी चोपले
शाळेतून चालत घरी जात असलेल्या दोन विद्यार्थिनींचे अपहरण करण्याचा प्रयत्न आज बोगस तृतीयपंथियांनी केला. मात्र दक्ष नागरिकांनी त्यांना बेदम चोपून पोलिसांच्या स्वाधीन केले. अपहरणाच्या कटात सहभागी असलेल्या रिक्षाचालकासह तिनही बोगस तृतीयपंथियांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मुलींच्या अपहरणाचा डाव फसला असला तरी विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वसईच्या खोचिवडे गावातील दोन शाळकरी मुली मूळगाव खारेकुरण येथून चालत घरी जात होत्या. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला एका रिक्षामध्ये दबा धरून बसलेल्या तृतीयपंथियांनी मुलींना घेरले आणि त्यांना जबरदस्तीने पकडले. तसेच या मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलींनी न डगमगता मोठ्याने बचाव बचाव, असा आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या आवाजाने परिसरातील दक्ष नागरिकांनी तत्काळ धाव घेतली.
मुलींच्या आवाजामुळे धावून आलेल्या नागरिकांनी तत्काळ तृतीयपंथियांना पकडले आणि त्यांना बेदम चोपले. रिक्षाचालक सूरज मातोल यालाही जाब विचारून बदडले. पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शरद शिंदे, संजय गोलनकर, नीलेश मांडवकर हे बोगस तृतीयपंथी व रिक्षाचालक सूरज मातोल या सर्वांना तत्काळ अटक केली. हे सर्वजण कळव्याचे रहिवासी आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालक व तृतीयपंथीय टेहळणी करीत होते, असे दिसून आले आहे.
Comments are closed.