वसईची केळी सातासमुद्रापार जाणार; उत्पादकांना ‘जैन इरिगेशन’चा मदतीचा हात

चवदार वसईची केळी लवकरच सातासमुद्रापार जाणार आहेत. येथील केळी उत्पादकांना जैन इरिगेशनने मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला असून लागवडीपासून ते अगदी निर्यातीपर्यंत सर्व प्रकारचे सहाय्य केले जाणार आहे. विशेषतः चिलिंग फ्री केळी परदेशात पाठवणे शक्य होणार असल्याने वसईच्या केळींना पुन्हा वैभवाचे दिवस येणार आहेत. येथील उत्पादकांना टिश्यू कल्चर व जी नऊ प्रकारची रोपे दिली जाणार असून आवश्यक असलेले मार्गदर्शनदेखील करण्यात येणार आहे.

वसईची केळी ही एकेकाळी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध होती, पण गेल्या काही वर्षांपासून त्याचे उत्पादन कमी होत गेले. यासंदर्भात सुखसंपत्ती संवर्धन सहकारी सोसायटी व जैन इरिगेशनच्या तांत्रिक सहकाऱ्याने निर्यातश्रम केळी उत्पादन तंत्रज्ञानावर केळी परिषद घेण्यात आली. या परिषदेस आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ व जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉ. के.बी. पाटील यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, वसईसह ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये निर्यातीच्या दर्जाची केळी पिकवण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे.

दोनशे शेतकऱ्यांचा सहभाग
वसईतील दर्जेदार केळी सातासमुद्रापार पाठवण्यासाठी जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानाचा वापर मोफत करून देण्यात येईल अशी ग्वाही जॉन अल्मेडा प्रतिष्ठानचे चेअरमन ओनिल अल्मेडा यांनी दिली. या परिषदेस विद्यावर्धिनी ट्रस्टचे अध्यक्ष विकास वर्तक, फ्रान्सिस डिकॉस्टा, विन्सेंट अल्मेडा आदी उपस्थित होते. वसई व पालघर परिसरातील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी परिषदेला हजेरी लावली.

जैन टिश्यू कल्चर ग्रॅण्ड, नेन केळीची व्हायरस मुक्त रोपे, गादी वाफा, डबल लॅटरल व फर्टीगेशनचे तंत्रज्ञान वापरले तर दहा ते अकरा महिन्यांमध्ये केळीचे चांगले उत्पादन होईल असा विश्वास डॉ. के. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

वाडा, तलासरी, मोखाडा, पालघर, वानगाव या भागात निर्यातश्रम केळीचे उत्पादन घेणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. मुंबईचे विमानतळ जवळ असल्याने केळींची निर्यात कमीत कमी वेळेत करणे शक्य होईल.

Comments are closed.