Vasant more reply nitesh rane who is vasant more question over bharat gogawale video
पुणे : शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, वसंत मोरे यांच्या निशाण्यावर मंत्री भरत गोगावले आले आहेत. वसंत मोरेंनी गोगावले यांचा एक अघोरी पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गोगावलेंवर चौफेर टीका होत आहे. गोगावलेंच्या व्हिडिओबद्दल प्रश्न विचारल्यावर मंत्री नितेश राणे यांनी ‘कोण वसंत मोरे?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. हेच वसंत मोरेंच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. आता वसंत मोरेंनी एक व्हिडिओ पोस्ट करत राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.
शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “रश्मी ठाकरेंचा शिवसेनेत पडद्यामागून बराचसा हस्तक्षेप होता. आम्ही स्त्री शक्तीचा आदर करतो. त्याबद्दल दुमत नाही. पण, ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना काही चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या त्या न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं. उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद द्यायला नको हे सर्वांचं म्हणणं होतं. त्यावेळेला तो हट्ट झाला, त्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं,” असा दावा गोगावलेंनी केला होता.
हेही वाचा : त्या आरोपांवर गोगोवले म्हणाले, हे सर्व पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी
यामुद्द्यावर बोलत असताना वसंत मोरेंनी भरत गोगावलेंचे अघोरी पूजा करतानाचे व्हिडिओ दाखवले होते. वसंत मोरेंनी गोगावलेंच्या दाखवलेल्या व्हिडिओबद्दल मंत्री नितेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, ‘कोण वसंत मोरे?’ असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला होता. ‘मनसेचे माजी नेते’ असे पत्रकारांनी सांगितले. त्यावर नितेश राणेंनी ‘आता कुठे आहेत?’ असा सवाल केला. तेव्हा पत्रकारांनी ‘ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत,’ असे म्हटलं.
हेच वसंत मोरेंच्या जिव्हारी लागलं आहे. वसंत मोरेंनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत सुरूवातीलाच नितेश राणेंचा व्हिडिओ लावण्यात आला आहे. तर नंतर ‘डू यू नो व्हू इज, ही इज अ बॉस ऑफ बॉस,’ असे संगीत लावलं आहे. तसेच, त्यात वसंत मोरेंनी जनतेसाठी केलेली कामे दाखवण्यात आली आहेत. शेवटीला नितेश राणे आणि वसंत मोरेंच्या भेटीचा एक प्रसंग दाखवण्यात आला आहे.
साहेब आम्ही गरिब शेतकऱ्या घरची लेकरं…
आम्ही राजकारणात येताना आमच्या मागे ना कुणाचा वसा होता ना कुणाचा वारसा घेऊन आम्ही जन्मलो…,
आम्ही आमचं अस्तित्व स्वतःच्या हिमतीवर तयार केलं आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही पुढाऱ्याने ओळखू दे अथवा ना ओळखू दे आमची मायबाप जनता आम्हाला ओळखते pic.twitter.com/MD9HAoFwGa
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 19, 2025
त्यावर कॅप्शन लिहिलेय की, ‘साहेब आम्ही गरिब शेतकऱ्या घरची लेकरं…आम्ही राजकारणात येताना आमच्या मागे ना कुणाचा वसा होता ना कुणाचा वारसा घेऊन आम्ही जन्मलो…आम्ही आमचं अस्तित्व स्वतःच्या हिमतीवर तयार केलं आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही पुढाऱ्याने ओळखू दे अथवा ना ओळखू दे आमची मायबाप जनता आम्हाला ओळखते हीच आमच्या कामाची पावती…’ यात वसंत मोरे नितेश राणेंना टॅग करायला विसरले नाहीत, हे महत्त्वाचे.
हेही वाचा : फडणवीसांना एलिमिनेट करण्यासाठी शिंदे गटाची अघोरी पूजा, राऊतांचा आरोपाने खळबळ
Comments are closed.