आरोग्य – योग्य उपचारांसाठी…

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

आजारावर उपचार घेताना डॉक्टरची पदवी बोगस तर नाही ना अशी शंका मनात येऊ शकते. ही साशंकता निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्या अशा बातम्यांचे वाढलेले प्रमाण. तेव्हा याबाबत दुर्लक्ष करून चालणार नाही.

एकदा माझ्या नातेवाईकांना परगावात डॉक्टर शोधण्याची वेळ आली आणि अर्ध्या रात्री जो उपलब्ध तो चांगला डॉक्टर याप्रमाणे एका डॉक्टरने त्यांना तपासून औषधे दिली. अशा परिस्थितीत त्यांनी  औषधोपचार घेण्यापूर्वी मला फोनवरून विचारलं. एकंदरीत औषधांच्या चिठ्ठीचा आढावा घेतला तर नावाखालची डिग्री कुठल्याही अधिकृत विद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतलेली वाटत नव्हती. त्यांना सावध करून जवळच्या शासकीय रुग्णालयात जावयास सांगितले. परंतु प्रत्येकाच्या घरी नातेवाईक डॉक्टर असतील असे नाही आणि असले तरी ते त्यांना सल्ला देतील असे नाही. मग योग्य डॉक्टर कोण हे कसे ओळखणार?

या भोंदू डॉक्टरांना आयुर्वेदात छद्मचर असे नाव आहे. एका पूर्वीच्या लेखात मी याचा उल्लेख केला आहे. अशा छद्मचर लोकांना वेळीच ओळखून त्यांच्याबरोबर कुठलेही व्यवहार करू नये असे सांगितले आहे, परंतु सध्या परिस्थिती वेगळी आहे. गावखेडय़ातील अर्धवट शहाणे, पण अज्ञानी आणि लालची मराठी अशा भोंदू डॉक्टरांना संरक्षण देतात आणि त्यांचे दुष्परिणाम गरीब जनतेला भोगावे लागतात. हे होऊ नये त्यासाठी हा लेख प्रपंच.

आपले उपचार यशस्वी होण्यासाठी खालील चार महत्त्वाचे घटक सर्वगुणसंपन्न हवे असे आयुर्वेद सांगतो.

यातील  पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे डॉक्टर. त्याविषयी आपण आज सविस्तर पाहू. कुठल्याही दवाखान्यात किंवा इस्पितळात जाण्यापूर्वी डॉक्टरांची डिग्री योग्य आहे अथवा नाही हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषत शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये आणि गावखेडय़ातून असे भोंदू डॉक्टर पुष्कळ पाहायला मिळतात. त्यातून योग्य डिग्री शोधून मगच त्यांच्याकडून उपचार घेणे योग्य ठरेल. डॉक्टरने ज्या युनिव्हर्सिटीत डिग्री घेतली असेल त्याचे नाव त्या बोर्डावर लिहिले की नाही हे तपासावे. आधुनिकीकरण करताना मेडिकल कौन्सिलने बारकोडही दिले आहेत जे स्कॅन केल्यावर मोबाईलवर डॉक्टरची संपूर्ण माहिती मिळू शकते. या भोंदू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे जीव धोक्यात आहेत. अभ्यास नसूनही अज्ञानापोटी त्यांनी दिलेल्या वेदनाशामक गोळ्या, स्टिराइड्स, अँटिबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके तसेच विनाकारण सलाईन लावणे यामुळे आता अनेक दुष्परिणाम दिसून येतात. किडनीचे विकार, यकृत विकार यांचे प्रमाण वाढत चालले आहे. एखाद वेळेस अचानक मृत्यू होत नसतील, पण हळूहळू पसरणारे विष अधिक घातक आहे. तेव्हा वेळीच सावध होणे गरजेचे आहे. योग्य डॉक्टर निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी दिलेली औषधाची चिठ्ठी अथवा रुग्ण डिस्चार्ज कार्ड इत्यादी कागदपत्रे योग्य प्रकारे स्वतजवळ जपून ठेवावीत. जर काही शंका वाटली अथवा निष्काळजीपणा वाटत असेल, तर तोडफोड व मारहाण करण्यापेक्षा कायदेशीररीत्या कारवाई करण्यासाठी कागदपत्रांचा वापर अधिक प्रभावी, कायदेशीर आणि उपयुक्त ठरेल.

द्रव्य म्हणजे औषध – औषधांची योग्यता ही चिकित्सा यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. औषध स्वस्त मिळतात म्हणून त्याच्या मागे न लागता परिणामकारक औषधांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे केमिस्टने योग्यप्रकारे दिलेली आहेत की नाही, याची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. औषध विकणारे आणि डॉक्टर यांचं साटंलोटं असल्याचा अनेकदा आरोप होतो. त्यासाठी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पुन्हा रुजवणे गरजेचे आहे. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील परस्पर संबंध सुदृढ होतील.

उपस्थाता म्हणजे परिचारक – दवाखान्यात आल्यानंतर पहिले ज्यांची भेट होते ते हे परिचारक होत. चांगले बोलणारे, ज्ञानसंपन्न, आपल्या कामाविषयी तत्पर असणारे परिचारक असतील तर रुग्ण अर्धे बरे होऊन जातात. त्यामुळे यशस्वी चिकित्सा होण्यासाठी परिचारक चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे.

स्वत रुग्ण हाही गुणवान असणे आवश्यक आहे. दिलेली औषधे वेळेवर घेणारा, चिडचिड न करणारा, आपल्याला काय होतंय हे नेमक्या भाषेत सांगणारा आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणारा असा रुग्ण असेल तर चिकित्सा यशस्वी होते असे आयुर्वेद सांगतो.

[email protected]

Comments are closed.