साईबाबांच्या भूमिकेतून नावारूपाला आलेल्या सुधीर दळवींच्या मदतीसाठी सरसावले दिग्गज कलाकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

साईबाबांच्या भूमिकेतून नावारुपाला आलेले अभिनेते सुधीर दळवी यांच्यावर एक कठीण प्रसंग ओढवला होता. 1977 साली प्रदर्शित झालेल्या ‘साई बाबा ऑफ शिर्डी’ या चित्रपटात साई बाबांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते सुधीर दळवी नुकतेच आजारी पडले होते. ते जवळपास महिनाभर रुग्णालयात दाखल होते. मात्र, आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते हळूहळू बरे होत आहेत. उपचारादरम्यान रुग्णालयाचे बिल लक्षणीयरीत्या वाढले होते आणि ते भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.

याकरता दळवी यांना बाॅलीवूडमधून अक्षय कुमार, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन यांनी आर्थिक मदत केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुधीर दळवी यांना नुकतेच मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सेप्सिस नावाचा रक्ताचा गंभीर संसर्ग झाला होता. या आजारामुळे त्यांच्या सांध्यांवरही परिणाम झाला आणि त्यांच्या हाता-पायांची हालचाल लक्षणीयरीत्या कमी झाली. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, जिथे ते जवळपास महिनाभर राहिले. या दीर्घकाळ चाललेल्या उपचारामुळे रुग्णालयाचे बिल सतत वाढत गेले.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सुधीर दळवी यांचे रुग्णालयाचे बिल 19 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले होते. डॉक्टरांनी असेही सांगितले की उपचाराचा खर्च आणखी वाढू शकतो. एवढी मोठी रक्कम उभी करणे कुटुंबासाठी कठीण होते आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सुधीर दळवी यांच्या कुटुंबाला त्यांच्या वैद्यकीय खर्चाची रक्कम भरणे कठीण वाटू लागले, तेव्हा डिसेंबर 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला त्यांच्या उपचारासाठी 11 लाख देण्याची परवानगी दिली. यामुळे त्यांच्या वैद्यकीय खर्चाबाबत कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला होता.

Comments are closed.