दया डोंगरे यांचे निधन, रुपेरी पडद्यावरील खाष्ट सासू हरपली
मराठी नाट्यसृष्टी व चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चित्रपटांमध्ये खाष्ट सासू, करारी वा आधुनिक स्त्री अशी कोणतीही व्यक्तिरेखा समर्थपणे साकारण्यात त्यांचा हातखंडा होता. ललिता पवार यांच्यानंतर खलनायिका म्हणून दया डोंगरे यांचे नाव घेतले जायचे. त्यांच्या निधनाने सशक्त अभिनेत्री हरपल्याची हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
दया डोंगरे हे नाव घेतले की रुपेरी पडद्यावरची खाष्ट, कजाक सासू उभी राहते. मराठी चित्रपटसृष्टीतला खलनायकी चेहरा अशी त्यांची ओळख बनली. करडा आवाज, डोळ्यांतील जरब आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी नकारात्मक व्यक्तिरेखा जिवंत केल्या. दया डोंगरे यांनी अनेक नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले. त्यांनी ‘चार दिवस सासूचे’ (मालिका), ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘उंबरठा’, ‘मायबाप’, ‘कुलदीपक’ यांसारख्या मराठी चित्रपटांत अभिनय केला. ‘स्वामी’ मालिकेतही त्यांची लक्षवेधी भूमिका होती. काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते. नाटक, चित्रपट अशा सर्व माध्यमांत त्यांनी काम केले, पण रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. ‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘संकेत मिलनाचा’, ‘चि.सौ.कां. चंपा गोवेकर’, ‘अमानुष’ यासारख्या नाटकांतून दमदार अभिनय केला. वसंत कानेटकर यांच्या ‘माणसाला डंख मातीचा’ या नाटकातील त्यांची सुप्रियाची भूमिका प्रभावीपणे साकारली. मराठीसह ‘आश्रय’, ‘जुंबिश’, ‘नामचीन’, ‘दौलत की जंग’ अशा हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. 1990 नंतर त्यांनी काम करणे थांबवले.
खाष्ट तरीही लोभस!
पडद्यावर खाष्ट, खडूस किंवा दुष्ट व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दया डोंगरे या संवेदनशील, लोभस होत्या. दया डोंगरे यांच्या आई यमूताई मोडक या अभिनेत्री होत्या तर गायिका आणि अभिनेत्री शांता मोडक यांच्या आत्या. या दोघींकडून दया डोंगरे यांनी कलेचा वारसा घेतला. त्यांना संगीत क्षेत्रात आपले करिअर करायचे होते. त्यांनी आकाशवाणी गायन स्पर्धेत नाव कमावले, मात्र पुढे त्या अभिनयाकडे वळल्या. दिल्लीतील एनएसडीमधून त्यांनी नाट्य प्रशिक्षण घेतले. नाट्यद्वयी या संस्थेमार्फत विविध नाटकांचे प्रयोग केले. ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘इडा पिडा टळो’ यांसारख्या नाटकांत डोंगरे यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.
			
											
Comments are closed.