ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डाॅक्टर आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या परळ येथील खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

गेल्या आठवड्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते बरे झाले परंतु अचानक गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. नाडकर्णी यांचे अंतिम दर्शन ठाणे येथील सप्तसोपान येथे 10.30 वाजता घेता येणार आहे. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. आनंद नाडकर्णी हे मानसोपचार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यामुळे महाराष्ट्रातील एक परिचित आणि विश्वसनीय नाव होते. मुंबईतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून मानसोपचार विषयात एमडी पदवी प्राप्त केली. गेली तीन दशकांहून अधिक काळ ते मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत होते.

डॉ. नाडकर्णी हे केवळ मानसोपचारतज्ज्ञ नव्हते, तर लेखक, नाटककार, कवी, संगीतकार, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती. पुस्तकं, व्याख्यानं, पॉडकास्ट आणि मुलाखतींच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्याचे विविध पैलू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक संवाद सुरू ठेवला होता. मानसिक ताण, नैराश्य, व्यसनमुक्ती आणि भावनिक आरोग्य यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक मोठा लढवय्या हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आजार आणि मानसोपचार या विषयांवर विपूल लेखन केलेले आहे.

Comments are closed.