ज्येष्ठ गायक-नट अरविंद पिळगांवकर यांचे निधन

मराठी संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक नट अरविंद पिळगांवकर यांचे रविवारी ताडदेव येथील घरी निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने प्रतिभावंत आणि अभ्यासू कलावंत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद पिळगांवकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ते पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य होते. त्यांनी दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्याकडे अभ्यास केला, ज्ञान मिळवले आणि नाटय़संगीताची परंपरा जोपासली. पिळगांवकर यांनी ‘घनश्याम नयनी आला’, ‘धाडिला राम तिने का वनी’, ‘सोन्याची द्वारका’, ‘संत नामदेव’, ‘भाव तोच देव’, ‘जय जगदीश हरे’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘दशावतारी राजा’, ‘विठो रखुमाय’ तसेच संगीत मानापमान, संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा आदी जुन्या अभिजात संगीत नाटकांतूनही भूमिका साकारली. मुंबई मराठी साहित्य संघ आणि विद्याधर गोखले प्रतिष्ठानतर्फे घेतल्या जाणाऱया प्रशिक्षण वर्गाचे ते मार्गदर्शक होते.

पिळगांवकर यांना राज्य शासनाचा जीवनगौरव पुरस्कार, अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत पुरस्कार, नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार, नाटय़ परिषदेचा बालगंधर्व पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले. तरुण पिढीतील कलावंतांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी अव्याहतपणे केले. त्यांच्या पश्चात पुतण्या, सून असा परिवार आहे.

Comments are closed.