VHT 2025-26: महाराष्ट्रासमोर अजिंक्य मुंबईचं कठीण आव्हान; पृथ्वी शॉवर सर्वांच्या नजरा, कोण जिंकणार?

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये मुंबई संघाने आतापर्यंत जबरदस्त वर्चस्व गाजवलं आहे. शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वाखाली मुंबईने यंदाच्या मोसमात एकही सामना न गमावता सलग चार विजयांची नोंद केली आहे. सिक्कीम, उत्तराखंड, छत्तीसगड आणि गोवा या संघांना नमवून मुंबई संघ शानदार फाॅर्ममध्ये आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी महाराष्ट्रविरुद्ध आता सलग पाचव्या विजयासाठी मुंबई सज्ज झाली आहे .

हा सामना दोन्ही संघांसाठी पाचवा असून, मुंबई विरुद्ध महाराष्ट्र ही लढत नेहमीच चुरशीची ठरते. दोन्ही संघांत टीम इंडियासाठी खेळलेले अनुभवी खेळाडू असल्यामुळे या सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

महाराष्ट्र संघाची यंदाची कामगिरी संमिश्र राहिली आहे. चार सामन्यांपैकी दोन विजय आणि दोन पराभव असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आहे. मात्र शेवटचा सामना जिंकल्यामुळे महाराष्ट्र संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडसमोर सलग चार सामने जिंकलेल्या मुंबईचा विजयरथ रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

या सामन्यात विशेष लक्ष असणार आहे ते पृथ्वी शॉच्या कामगिरीकडे. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमावलेल्या पृथ्वीने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र संघात प्रवेश केला आहे. मुंबईतील अनेक खेळाडूंशी त्याची चांगली ओळख असल्यामुळे, माजी संघाविरुद्ध पृथ्वी मोठी खेळी करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामना शनिवारी, 3 जानेवारी रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना सकाळी 9 वाजता सुरू होईल, तर टॉस 8.30 वाजता होणार आहे. मात्र हा सामना टीव्ही किंवा मोबाईलवर थेट प्रक्षेपित केला जाणार नाही. स्पर्धेच्या सी ग्रुपमध्ये मुंबई संघ 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर महाराष्ट्र 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

Comments are closed.