VHT 2025: पंत फ्लॉप, पण कोहलीच्या 'खास' खेळाडूने दिल्लीला जिंकवून दिला हरलेला सामना!
विजय हजारे स्पर्धेत दिल्लीने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. सौराष्ट्रविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने 3 गड्यांनी रोमहर्षक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रने 50 षटकांत 7 गडी गमावून धावफलकावर 320 धावा लावल्या होत्या. दिल्लीने 321 धावांचे हे कठीण लक्ष्य 48.5 षटकांत ७ गडी राखून पूर्ण केले.
संघाकडून प्रियांश आर्याने 45 चेंडूत 78 धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र, एका क्षणी हा सामना दिल्लीच्या हातातून पूर्णपणे निसटलेला दिसत होता. अशा वेळी नवदीप सैनीने अंतिम षटकांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत सामन्याचे चित्र पालटले आणि दिल्लीला 3 गड्यांनी विजय मिळवून दिला.
321 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 248 धावांवर 6 गडी गमावून अडचणीत सापडला होता. मात्र, त्यानंतर नवदीप सैनी आणि हर्ष त्यागी यांनी मोर्चा सांभाळला आणि सातव्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी केली. सहसा आपल्या गोलंदाजीने मॅच फिरवणारा नवदीप यावेळी बॅटने चमकला. त्याने अवघ्या 29 चेंडूंत 34 धावांची दमदार खेळी केली, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार सामील होता. हर्षने देखील चांगली साथ देत 45 चेंडूंत 49 धावा केल्या. हर्षच्या खेळीत 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
नवदीप सैनीने बॅटने योगदान देण्यापूर्वी चेंडूनेही कमाल केली होती. त्याने 10 षटकांच्या स्पेलमध्ये 41 धावा देऊन 3 महत्त्वाचे गडी बाद केले. नवदीपने सौराष्ट्रकडून शतकी खेळी करणाऱ्या विश्वराज जडेजाला बाद केले, तसेच हार्विक देसाई आणि प्रेरक मांकड यांनाही तंबूत धाडले.
दुसरीकडे, दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतची बॅट या सामन्यात शांत राहिली. पंत चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकला नाही आणि 26 चेंडूत केवळ 22 धावा करून बाद झाला. दिल्लीकडून तेजस्वी दहियाने सर्वाधिक 53 धावा केल्या. तेजस्वीने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या विजयासह दिल्लीने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला आहे.
Comments are closed.