देशातील निवडणूक प्रक्रियेशी छेडछाड चिंताजनक, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे परखड मत
![jagdeep dhankad 1](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/jagdeep-dhankad-1-696x447.jpg)
देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा होत असलेला प्रयत्न किंवा छेडछाड ही अत्यंत चिंताजनक बाब असून, न्यायपालिकेचा वापर एखाद्या शस्त्रासारखा होत आहे. हे जगात कुठल्याही देशात घडत नाही, असे परखड मत उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी मांडले. महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अचानक वाढलेल्या मतदानावरून सुरू असलेला गदारोळ आणि उघड झालेल्या ईव्हीएम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर धनखड यांचे मत अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
हावेरी जिल्ह्यातील रानेबेन्चुर येथे कर्नाटक विभव लेक्चर अँड कल्चरल फेस्टिव्हलच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. देशभरात निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकून संपूर्ण प्रक्रियेशी छेडछाड केली जात आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. देशात पूर्वीची म्हणजेच जुनी लोकशाही ही अधिक मजबूत, पुरोगामी आणि जिवंत लोकशाही होती. गाव, शहर, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर घटनात्मकदृष्ट्या अत्यंत मजबूत लोकशाही जगात केवळ आपल्याच देशात होती. कारण, त्यावेळी निवडणूक प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव टाकला जात नव्हता. मात्र, आता निवडणूक प्रक्रियेशी छेडछाड केली जात आहे, असा आरोप जगदीप धनखड यांनी केला. राष्ट्रविरोधी कारवायांसाठी पैशांचा वापर विविधप्रकारे विविध स्तरांवर फूट पाडली जात आहे. त्यासाठी अनेक मुद्द्यांवर नवनव्या मार्गाचा वापर केला जात असून, न्यायपालिकेचा वापर केला जात आहे, असा आरोप धनखड यांनी केला. घटनेने प्रत्येकाला न्याय मागण्याचा हक्क दिला आहे. परंतु गेल्या काही वर्षांत राष्ट्रविरोधी कारवायांसाठी किंवा भावना व्यक्त करण्यासाठी पैशांचा वापर केला जात आहे. तसेच न्यायपालिकेचा शस्त्रासारखा वापर केला जात आहे. असे इतर कुठल्याही देशात घडत नाही, असा दावाही धनखड यांनी केला.
देशापुढे राष्ट्रवाद आणि प्रादेशिक वादाचे आव्हान
देशापुढे सध्या राष्ट्रवाद आणि प्रादेशिक वादाचे आव्हान आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून प्रचंड वाद होत आहेत. या माध्यमातून देशातील सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही धनखड यांनी केला. देशाची प्रगती जेव्हा मी जगाच्या नजरेतून बघतो, तेव्हा आपल्या देशातील लोक मला पावसात नाचणाऱ्या मोराच्या पिसासारखे वाटतात. परंतु मोराच्या पायाकडे पाहिले तर काळजी वाटते. कारण, देशाला सांस्कृतिक तत्त्वज्ञानाची गरज आहे. आपण आपली भरभराटीची तीच शाखा कापतो आहोत, ज्यावर आपण बसलो आहोत, असेही ते म्हणाले.
Comments are closed.