सुदर्शन रेड्डी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा; इंडिया आघाडीची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी आज मुंबईत आले होते. मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे पाऊणतास चाललेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांची विविध विषयांवर चर्चा झाली.
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीनिमित्त सुदर्शन रेड्डी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मातोश्रीवर रेड्डी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन केले तसेच निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. इंडिया आघाडीकडे संख्याबळ कमी असले तरी यावेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत चमत्कार घडेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
शिवसेना पह्डलीत, नेते चोरले आणि आता पाठिंबा मागता?
एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला पह्न करून विनंती केली होती. पण ज्यांनी शिवसेना फोडली, शिवसेना चोरली त्यांना जनतेने निवडून दिलेल्या शिवसेनेच्या खासदारांची मते पाहिजेत, याबद्दल आश्चर्य वाटले असे उद्धव ठाकरे म्हणाले. फडणवीस यांनाच आपण पह्न करून रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती करणार आहोत, असा टोलाही त्यांनी मारला.
गरज संपली की फेकून द्या या पद्धतीला नाकारले पाहिजे
उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी मातोश्रीवर भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने न मागता एनडीएला मतदान केले होते. त्यावेळी कुणीही विनंती केली नव्हती. पण त्यानंतर शिवसेनेचे साधे आभार मानायलाही कुणी फोन केला नाही, याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी करून दिली. गरज असेल तेव्हा वापरा आणि नसेल तेव्हा फेकून द्या ह्या पद्धतीला आपल्याला नाकारले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात.
संसदेतील संख्याबळ
भाजपप्रणित एनडीए आघाडी – 457
इंडिया आघाडी – 300 पेक्षा जास्त
भारत आघाडीकडे उपराष्ट्रपती पदासाठी आवश्यक संख्याबळ नाही? पण आपला देश सध्या एका विचित्र परिस्थितीमध्ये नेला जात आहे? ते थोपवता आले तरच आपल्या देशाची लोकशाही वाचेल आणि दीडशे वर्षांनंतर ज्या गुलामगिरीतून सुटका झाली तिकडे आपला देश पुन्हा जाणार नाही? – उद्धव ठाकरे
Comments are closed.