होमगार्ड महिलेवर दोन ACP कडून लैंगिक अत्याचार होत असेल तर महिलांच्या सुरक्षेचं काय? करुणा मुंडेंचा सवाल

ठाण्यातील एका होमगार्ड महिलेने प्रसारमाध्यमांसमोर येत दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. करुणा मुंडे यांनी या महिलेला समोर आणत ही घटना उघड केली आहे. या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. होमगार्ड असलेल्या महिलेवर दोन एसीपींनी लैंगिक अत्याचार केला. तिने तक्रार दाखल करू नये म्हणून पोलिसांनी तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला. आता तिच्या मुलींनाही त्रास देण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला न्याय मिळवण्यासाठी फिरत आहे, मात्र तिची कोणीही दखल घेतली नाही. या प्रकरणातील आरोपी एसीपी असल्यामुळे कोणीही महिलेची मदत करायला तयार नाही, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. पोलीस दलातील हे प्रकरण उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
करुणा मुंडे यांच्यासोबत पीडित महिलेने पत्रकार परिषद घेत ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो दाखवत त्यांच्यावर आरोप केला. ठाण्यातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने जिम परिसरात माझ्याशी ओळख केली. मी तुम्हाला ओळखतो, असे सांगत त्याने माझा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तो मला सातत्याने मोबाईलवर चांगले-चांगले मेसेज करत होता. एक दिवस त्याने मला त्याच्या घरी चहासाठी बोलावले. तुम्ही माझ्या घरी चहासाठी यावे, अशी माझ्या बायकोची इच्छा असल्याचे तो म्हणाला. तसेच फोनवर माझे एका महिलेशी बोलायला सांगितले. त्याची बायको आपल्याशी फोनवर बोलल्याचे समजून आपण त्याच्या घरी चहा प्यायला गेले. तिथे गेल्यावर त्याने मला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि त्याने आणि त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका पोलिसाने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.
मला शुद्ध आल्यानंतर मी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, पण तिथं माझी तक्रार घेतली नाही. त्यानंतर मी डीसीपी, सीपी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून माझ्यासोबत झालेला प्रकार सांगितला, पण कोणीही दखल घेत नाही. माझं राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगणं आहे की पुढील 8 दिवसांत जर तुम्ही या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर मी माझं आयुष्य संपवणार आहे, असा इशाराही सदर महिलेने दिला आहे.
होमगार्ड असलेल्या महिलेवरच जर अत्याचार होत असेल तर महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांच्या सुरक्षेचं काय? महाराष्ट्रात शासन प्रशासन कुठे आहे महिलांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शासकीय अधिकारी आणि आजी-माजी मंत्री मन भरून हनीमून करत आहेत, मात्र मन भरल्यानंतर त्यांना तेच हनी हे हनी ट्रॅप वाटत आहे,” असा हल्लाबोलही करुणा मुंडे यांनी केला आहे.
Comments are closed.