U19 Asia Cup: श्रीलंकेचा पराभव करत भारताची फायनलमध्ये एन्ट्री! रविवारी पाकिस्तानविरुद्ध रंगणार विजेतेपदासाठी लढत
आयुष म्हात्रेच्या (Ayush Mhatre) नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंडर-19 आशिया चषक 2025 च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सनी पराभव करत आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 50-50 ऐवजी 20-20 षटकांचा खेळवण्यात आला. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 138 धावा केल्या. श्रीलंकेकडून चमिका हीनातिगलाने सर्वाधिक 42 धावा केल्या.
भारताकडून हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे (7) आणि वैभव सूर्यवंशी (9) स्वस्तात बाद झाले. भारत 25 धावांत 2 विकेट्स गमावून संकटात असताना विहान मल्होत्रा आणि एरोन जॉर्ज यांनी डाव सावरला. विहान मल्होत्राने 61 धावा आणि एरोन जॉर्जने 58 धावा करत नाबाद अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या जोडीने 18 षटकांमध्ये भारताला 8 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने बांगलादेशचा 8 विकेट्सनी पराभव करत फायनल गाठली आहे. त्यामुळे रविवारी, 21 डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात अंतिम सामना (फायनल) खेळवला जाईल. हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर हे दोन्ही संघ विजेतेपदासाठी भिडतील.
Comments are closed.