विदर्भात उर्वरित भारत 224 धावांनी आघाडीवर आहे

इराणी करंडक सामना : यश ठाकुरचे 4 बळी

वृत्तसंस्था / नागपूर

येथे सुरू असलेल्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शुक्रवारी विदर्भ संघाने शेष भारत संघावर 224 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. दरम्यान दिवसअखेर विदर्भने दुसऱ्या डावात 2 बाद 96 धावा जमविल्या. विदर्भच्या यश ठाकुरने 66 धावांत 4 गडी बाद केले.

या सामन्यात विदर्भने पहिल्या डावात 342 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर विदर्भने दुसऱ्या डावात 2 बाद 96 धावा जमवित शेष भारतावर एकूण 224 धावांची आघाडी घेत आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. तत्पूर्वी, शेष भारताचा पहिला डाव 214 धावांत आटोपला. रजत पाटीदार आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी अर्धशतके झळकविली. या सामन्यातील खेळाचे दोन दिवस बाकी असून विदर्भचा संघ मोठा विजय मिळविण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे.

शेष भारताने 5 बाद 142 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे पाच गडी 72 धावांची भर घालत तंबूत घरी परतले. रजत पाटीदारने अर्धशतक झळकविले तर अभिमन्यू ईश्वरनच्या अर्धशतकामुळे शेष भारताला 214 धावांपर्यंत मजल मारता आली. यश ठाकुरने सारांश जैनला बाद केले. त्याने या सामन्यात शेष भारताच्या पहिल्या डावात 66 धावांत 4 गडी बाद केले. पाटीदारने 125 चेंडूत 10 चौकारांसह 66 धावा जमविल्या. शेष भारताची स्थिती 9 बाद 191 असताना पाटीदार बाद झाला. सलामीच्या ईश्वरनने 52 धावा जमविल्या. ऋतुराज गायकवाडने 9 तर धूलने 11 धावा केल्या. विदर्भने पहिल्या डावात शेष भारतावर 128 धावांची आघाडी घेतली. विदर्भने दुसऱ्या डावाला सुरूवात केल्यानंतर दिवसअखेर 2 बाद 96 धावा जमविल्या. अमन मोखाडे 37 धावांवर बाद झाला तर शोरे 24 आणि दानिश मालेवार 16 धावांवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक: विदर्भ प. डाव 342, शेष भारत प. डाव 69.5 षटकात सर्वबाद 214 (रजत पाटीदार 66, ईश्वरन 52, यश ठाकुर 4-66, पार्थ रेखाडे आणि हर्ष दुबे प्रत्येकी 2 बळी), विदर्भ दु. डाव 2 बाद 96 (मोखाडे 37, ध्रुव शोरे खेळत आहे 24, मालेवार खेळत आहे 16).

Comments are closed.