हर्ष दुबेच्या नेतृत्वाखाली विदर्भाने पहिल्यांदाच जिंकली विजय हजारे ट्रॉफी! सौराष्ट्र संघाचा 38 धावांनी पराभव

विदर्भ संघाने दमदार खेळ करत विजय हजारे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रवर 38 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं.

सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. विदर्भने सलामीवीर अथर्व तायडेच्या शतकी खेळीच्या बळावर 317 धावांची मजल मारली. अथर्व आणि स्पर्धेत झंझावाती फॉर्मात असणाऱ्या अमन मोखाडेबरोबर 80 धावांची सलामी दिली. अमन 33 धावांवर बाद झाला. यश राठोडने 54 धावा करत अथर्वला चांगली साथ दिली. अथर्वने 15 चौकार आणि 3 षटकारांसह 128 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. अथर्व आणि यश बाद झाल्यानंतर विदर्भची घसरगुंडी उडाली.

सौराष्ट्रतर्फे अंकुर पनवरने 4 विकेट्स पटकावल्या. चेतन सकारिया आणि चिराग जानी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

पाठलाग करताना खेळताना सौराष्ट्रची सुरुवात डळमळीत झाली. अनुभवी प्रेरक मंकडने 10 चौकारांसह 88 धावांची खेळी केली. चिराग जानीने 64 धावा करत प्रेरकला चांगली साथ दिली. प्रेरक-चिराग बाद झाले आणि सौराष्ट्रच्या विजयाच्या आशा मावळल्या. सौराष्ट्रचा डाव 279 धावांतच आटोपला. विदर्भतर्फे यश ठाकूरने 4 तर नचिकेत भुटेने 3 विकेट्स पटकावल्या. दर्शन नालकांडेने 2 विकेट्स घेत या दोघांना चांगली साथ दिली.

Comments are closed.