Iran US Israel War – अमेरिकेला दणका दिल्यानंतर इराणचा बहरीनवर हल्ला, तेल शुद्धीकरण प्रकल्पावर डागले क्षेपणास्त्र
इराण, अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध शांत होण्याची काहीच चिन्ह नाहीत. या युद्धात इस्रायल-अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून इराणही त्याच ताकदीने मैदानात उतरला आहे. अशातच इराणने बहरीनमधील ‘बापको एनर्जीज’ (Bapco Energies) या महत्त्वाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर रविवारी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात एका मोठ्या स्टोरेज टँकला आग लागली. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक क्षेपणास्त्र प्रचंड वेगाने आकाशातून खाली येताना दिसले आणि त्यानंतर झालेल्या प्रचंड स्फोटामुळे आगीच्या ज्वाळा भडकल्या आणि धूराचे लोट आकाशात उठताना दिसत आहेत. सुदैवाने, आपत्कालीन पथकाने तत्काळ कारवाई केल्यामुळे ही आग विझवण्यात यश आल्याची माहिती आहे. बापको एनर्जीज या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आणखी एक इराणी स्ट्राइक बहरीनच्या बाप्को रिफायनरीला बसला – तेलाच्या साठ्याला आग लागली
संपूर्ण विभाग नियंत्रणाबाहेर जळताना दिसत आहेत https://t.co/H5APhx0p9i pic.twitter.com/g7OvYKoR8B
— RT (@RT_com) 5 एप्रिल 2026
हा तेल शुद्धीकरण प्रकल्प बहरीनच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार मानला जातो. दररोज सुमारे 4 लाख बॅरल तेल शुद्ध करण्याची या प्रकरल्पाची क्षमता आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातही या प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले होते, ज्यामुळे तिथल्या कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. कंपनीने सध्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे.
आखातातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर या भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच संघर्षाचा भाग म्हणून इराणने बहरीनच्या या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या सुविधेवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Comments are closed.