VIDEO: सर, तुम्ही एवढं ग्लो कसं करता? हरलीन देओलचा मोदींना मजेशीर प्रश्न; पीएम म्हणाले …

भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर, संघाने 5 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंशी मुक्त संवाद साधत त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. संघाने तणावाच्या परिस्थितीत दाखवलेले धैर्य, संघभावना आणि जिद्दीचे पंतप्रधानांनी विशेष कौतुक केले. संपूर्ण वातावरण आनंदी आणि उत्साहाने भरलेले होते.

या संवादादरम्यान एक मजेशीर प्रसंग घडला. टीमची स्टार ऑलराउंडर हरलीन देओलने पंतप्रधान मोदींना हसत विचारले, “सर, तुमचं स्किनकेअर रूटीन काय आहे? तुम्ही खूप ग्लो करता!” तिच्या या प्रश्नावर उपस्थित सर्व खेळाडू, सहाय्यक स्टाफ आणि स्वतः पंतप्रधान देखील हसून गेले. मोदींनीही हलक्याफुलक्या अंदाजात उत्तर देताना सांगितले, “मी या विषयाकडे फारसे लक्ष दिले नाही. मी गेल्या 25 वर्षांपासून सरकारमध्ये आहे, त्यामुळे कदाचित चेहऱ्यावर काही बदल झाले असतील.”

तेवढ्यात स्नेह राणाने तात्काळ प्रतिक्रिया देत म्हटले, “सर, हा ग्लो देशातील कोट्यवधी लोकांच्या प्रेमाचा आहे.” तिच्या या वाक्यावरही सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलले. संभाषणादरम्यान मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार यांनी देखील हलक्या हास्याचा फुगा फोडताना सांगितले की, “यांच्यासोबत रोज सराव करावा लागतो, म्हणूनच माझे केस पांढरे झाले आहेत.” या सर्व प्रसंगामुळे भेटीचे वातावरण अधिक मैत्रीपूर्ण झाले.

दरम्यान, महिला संघाने या वर्षी इतिहास रचला. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत प्रथमच महिला वनडे विश्वचषक जिंकला. 2005 आणि 2017 मध्ये अंतिम फेरी गाठूनही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यावेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाने जबरदस्त कामगिरी करत देशाला बहुप्रतीक्षित ट्रॉफी मिळवून दिली.

Comments are closed.