VIDEO: “तुम्ही मला असा प्रश्न विचारला तर मी 2-3 हजार धावा म्हणेन”, वैभव सूर्यवंशीने गाजवली पत्रकार परिषद

आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आहे. या हंगामात राजस्थानच्या १४ वर्षीय स्फोटक फलंदाजी वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. तो २०२५ च्या हंगामात मध्यातच आला होता, मात्र दुसऱ्याच सामन्यात त्याने ३५ चेंडूत शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने देशांतर्गत स्पर्धा आणि युवा विश्वचषकात धावांचा पाऊस पाडला. आता तो आयपीएलचा नवा हंगाम खेळण्यास सज्ज असून त्याआधी झालेल्या कार्यक्रमात तो या हंगामात किती धावा करणार असे विचारले असता त्याने मजेशीर उत्तर दिले आहे.
राजस्थानला वैभवकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळेच एका पत्रकाराने त्याला १९ व्या हंगामातील त्याच्या लक्ष्याबद्दल विचारले होते. पत्रकाराने विचारले, “आयपीएल २०२६ साठी तुझ्या काय योजना आहेत? जसे की तुला किती धावा करायच्या आहेत, आयपीएल ऑरेंज कॅपसाठी तुझे ध्येय आहे का?” यावर वैभव म्हणाला, “तुम्ही असा प्रश्न विचारत असाल तर, मी म्हणेन दोन ते तीन हजार धावा.” त्याचे हे उत्तर ऐकून सर्वांना हसू फुटले.
राजस्थानच्या या युवा स्टारने पुढे म्हटले, “माझे कोणतेही विशिष्ट धावांचे लक्ष्य नाही. मला संघासाठी ट्रॉफी जिंकायची आहे. आम्ही वैयक्तिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करत नाही. या हंगामात अधिक चांगली कामगिरी करणे हेच आमचे ध्येय आहे.”
२०२५ च्या हंगामाआधी झालेल्या लिलावात राजस्थानने वैभवला १.१ कोटी रुपयांना संघात घेतले होते. त्यामुळे तो प्रसिद्धिस आला होता. त्या हंगामात सुरूवातीला त्याला संधी मिळाली नाही, मात्र संजू सॅमसनच्या दुखापतीनंतर तो सलामीवीर म्हणून संघात आला आणि ७ सामन्यांत ३६ च्या सरासरीने २५२ धावा केल्या.
वैभवने २०२६ च्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकात संघासाठी उत्तम कामगिरी केली होती. तेथे स्पर्धेच्या सुरूवातीला त्याची बॅट शांत राहिली, मात्र त्याने अंतिम सामन्यात ८० चेंडूत १७५ धावा केल्या होत्या. आता तो आयपीएलमध्येही अशीच कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे.
Comments are closed.