VIDEO: अफगाणिस्तानविरुद्ध रोहित-प्रसिद्धची खास हॅट्ट्रीक! दोघांच्याही नावावर झाली 'या' रेकॉर्ड्सची नोंद

भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नईमध्ये आज (शनिवार, २० जून) खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये अनेक बदल दिसले. केएल राहुलला विश्रांती देण्यात आली असून प्रसिद्ध कृष्णा, नितीश कुमार रेड्डी आणि हर्ष दुबे यांनी संघात पुनरागमन केले. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांचा हा निर्णय चुकल्याने त्वरित लक्षात आले, कारण प्रसिद्धने त्याच्या पहिल्याच षटकात पाहुण्या संघाला धक्का दिला. त्याने चार षटकांत चार फलंदाजांना माघारी पाठवले. त्यामधील तीन झेल रोहित शर्माने घेतले आणि दोघांनी आपापल्या नावावर अनोखे विक्रम नोंदवले.

प्रसिद्धने त्याच्या टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर रहमानुल्लाह गुरबाजला (५) बाद केले. त्यानंतर अफगाणिस्तानच्या डावातील सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रहमत शाहला (५) बाद केले. आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर इब्राहिम जादरानला (११) बाद केले. त्यामुळे अफगाणिस्तानची स्थिती ८ षटकांनंतर ३ बाद २९ धावा अशी झाली. विशेष म्हणजे या तिन्ही विकेट्स झेलबाद प्रकारे गेल्या आणि हे तिन्ही झेल रोहितने घेतले. त्यामुळे रोहित एकाच वनडे सामन्यात एकाच गोलंदाजाच्या गोलंदाजीवर तीन झेल घेणारा तिसरा भारतीय ठरला आहे.

वनडे सामन्यात एकाच गोलंदाजाच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षकाने घेतलेले तीन झेल (भारत)
१) व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गोलंदाज इरफान पठाण विरुद्ध झिम्बाब्वे, पर्थ 2004
२) शिखर धवन आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह विरुद्ध बांगलादेश, दुबई 2018
३) रोहित शर्माने आणि गोलंदाज प्रसिध्द कृष्णा विरुद्ध अफगाणिस्तान, चेन्नई 2026*

एका डावात पहिले तीन विकेट्स (बाद) मिळवण्यात सहभागी असलेला एकच क्षेत्ररक्षक (भारत)
सौरव गांगुली वि. वेस्ट इंडीज, बडोदा २००२
मनोज तिवारी विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉर्थ साउंड 2011
सुरेश रैना विरुद्ध श्रीलंका, कार्डिफ 2013
रोहित शर्मा वि. अफगाणिस्तान, चेन्नई २०२६ *

रोहितबरोबर प्रसिद्धनेही एका विशेष यादीत प्रवेश केला आहे. तो वनडे क्रिकेटच्या इतिहासात आपल्या पहिल्या १० षटकांत चार विकेट्स घेणारा सातवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनीही केली आहे. अशी कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांची यादी खालीलप्रमाणे

वनडे सामन्यांमध्ये भारतासाठी पहिल्या १० षटकांत ४ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारे
५ – मोहम्मद सिराज विरुद्ध श्रीलंका (कोलंबो आरपीएस) २०२३
4 – जवागल श्रीनाथ विरुद्ध श्रीलंका (जोहान्सबर्ग) 2003
४ – भुवनेश्वर कुमार विरुद्ध श्रीलंका (पोर्ट ऑफ स्पेन) २०१३
४ – जसप्रीत बुमराह विरुद्ध इंग्लंड (द ओव्हल) २०२२
४ – मोहम्मद सिराज विरुद्ध श्रीलंका (तिरुवनंतपुरम)
४ – अर्शदीप सिंग वि दक्षिण आफ्रिका (जोहान्सबर्ग) २०२३
४ – प्रसिद्ध कृष्णा विरुद्ध अफगाणिस्तान (चेन्नई) २०२६ *

या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकत आधीच २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या सामन्यातही यजमान संघाची कामगिरी पाहता तिसरा सामना जिंकत अफगाणिस्तानला क्लीनस्वीप देण्याच्या तयारीत शुबमन गिल आणि कंपनी आहे.

Comments are closed.