अशोक खरात बड्या अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी संबंध ठेवायला सांगायचा; विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात याचे अनेक आमदार, खासदार, मंत्री, बडे अधिकारी यांच्याशी लागेबांधे असल्याचेही उघड झाले. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. अशोक खरात हा बड्या अधिकाऱ्यांच्या पत्नींना एकमेकांसोबत शेअर करायला लावत होता,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची अस्मिता आणि इज्जत वेशीवर टांगली गेल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अनेक मंत्री, आमदार आणि आयएएस-आयपीएस दर्जाचे मोठे अधिकारी या भोंदूच्या संपर्कात होते. मोठ्या अधिकाऱ्यांच्या बायका खरातच्या केबिनमध्ये असायच्या आणि हे अधिकारी बाहेर ताटकळत बसलेले असायचे. या भोंदूने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकमेकांच्या ‘फॅमिली शेअर’ करायला लावल्याचे नवीन प्रकरण आता समोर येत आहे. हे अत्यंत घाणेरडे स्वरूप असून यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली आहे.
या प्रकरणात केवळ अंधश्रद्धा नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, खरातच्या पेनड्राइव्हमध्ये 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. काळा पैसा पांढरा करून देणारे चेहरे या बाबाच्या सोबत दिसत आहेत. कदाचित हा भोंदू बाबा मंत्र्यांचा पैसा पांढरा करण्याचा धंदा करत असावा. या प्रकरणाची व्याप्ती पाहता केवळ एसआयटीचौकशी पुरेशी नाही, तर याची चौकशी सीबीआय किंवा ईडीमार्फत व्हायला हवी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात झालेल्या सत्तांतरात आणि पक्षफुटीमध्येही खरातचा सक्रिय हात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, पुराव्याशिवाय बोलणे योग्य नाही, परंतु भाजपच्या काळात अशा भोंदूगिरीला आणि अंधश्रद्धेला प्रचंड पेव फुटले आहे. लोकांची दिशाभूल करून त्यांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यासाठी ही एक प्रकारची ‘फॅक्टरी’ सुरू करण्यात आल्याचा घणाघात त्यांनी केला.
मार्च एंडिंगच्या निमित्ताने मंत्रालयातून निघणाऱ्या जीआरवरही वडेट्टीवार जोरदार टीका केली. एका दिवसात 100-100 जीआर काढले जात आहेत. मर्जीतील कंत्राटदारांना कमिशन घेऊन पैसे वाटले जात आहेत. 25 कोटींच्या बिलासाठी 35 कोटींचे वाटप सुरू असून, मंत्रालय आता सामान्य माणसाचे राहिले नसून लुटारूंच्या टोळीचे केंद्र झाले आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
Comments are closed.