कुणाच्याही बापाची इथे कायमस्वरूपी सत्ता नाही, सूर्य उगवतो आणि मावळतोहीच; विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

निवडणुकीच्या तोंडावर आमच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याचा व मारहाण झाल्याचा प्रयत्न झाला. आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे. आज तुमचा दिवस आहे. उद्या आमचा येईल. सूर्य उगवतो आणि मावळतोही. कुणाच्याही बापाची इथे कायमस्वरूपी सत्ता नाही. सत्तेचा मुकुट कायम बदलत असतो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्यातील सरकारला सुनावले.

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष विजयी झाले. या विजयी नगराध्यक्षांचा आज टिळक भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी पैशांचा वारेमाप वापर केला. पोलिसांचा वापर केला. निवडणूक आयोग त्यांच्या मदतीला होता. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यात आली, मारहाण करण्यात आली, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता न डगमगता लढला व यश मिळवले.

तेव्हा आम्हीही तुमची मस्ती काढू

हे लोक फक्त भीती घालतात. दुसरे काहीही करत नाहीत. आमच्या उमेदवारांवर निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आमच्या एका नेत्याला नगर जिह्यात मारहाण झाली. त्यांना गाडीत कोंबून नेण्यात आले. ठीक आहे, आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे. उद्या आमचा दिवस येईल, तेव्हा आम्हीही तुमची मस्ती काढू, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

Comments are closed.