Vijay Wadettiwar’s reaction to the central government’s decision to conduct caste-wise census


मुंबई : अनेक दिवसांपासून देशात जनगणना घेण्यासोबतच जातनिहाय जनगणना घेण्याची मागणी होत होती. अशातच केंद्र सरकारने आज (30 एप्रिल) जातनिहाय जनगणना करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी सप्टेंबरपासून जनगणनेला सुरुवात होणार असून ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान 2 वर्षे लागतील. केंद्र सरकारच्या या निर्णयावर आता विरोधक प्रतिक्रिया देत आहेत. (Vijay Wadettiwar’s reaction to the central government’s decision to conduct caste-wise census)

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, देशात जातनिहाय जनगणना होणार असल्याच्या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. कारण आमचे नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी “ज्यांची जितकी संख्या, त्यांची तितकी हिस्सेदारी” या स्पष्ट भूमिकेतून ही मागणी सातत्याने मांडली होती. ओबीसी, दलित, आदिवासी आणि मागास समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीला याआधी स्पष्टपणे विरोध केला होता. मात्र, आज अचानक असा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारची निवडणूक जाहीर होत आहे, हे लक्षात घेता ही घोषणा केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली आहे.

हेही वाचा – Caste Census : देशात जातनिहाय जनगणना होणार, केंद्र सरकारचा निर्णय

विजय वडेट्टीवार म्हणाले की, जातनिहाय जनगणना ही केवळ आकड्यांची मोजणी नसून, ती प्रत्येक घटकाच्या हक्काची आणि संधीची मोजणी आहे. त्यामुळे ही जनगणना निर्णायक ठरू शकते, पण ती तेव्हाच निर्णायक ठरेल, जेव्हा ती प्रामाणिकपणे आणि पूर्ण पारदर्शकतेने राबवली जाईल. त्यामुळे जातनिहाय जनगणना ही घोषणा केवळ राजकीय स्टंट न राहता, सामाजिक न्यायाच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरावे, हीच आमची अपेक्षा असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे.

हेही वाचा – Classroom Scam : सिसोदिया आणि जैन यांच्यावर गुन्हा दाखल; 2 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप





Source link

Comments are closed.