महाप्रसादाच्या तयारीत काळाचा घाला! गरम सांबाराच्या टोपात पडून महिलेचा मृत्यू – TMarathiNews
विजयवाडा : गणेशोत्सवाच्या महाप्रसादाची तयारी सुरू असताना घडलेल्या दुर्दैवी अपघातात 46 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गरम सांबाराने भरलेल्या टोपात पडल्याने गंभीररित्या भाजलेल्या सुजाता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
विजयवाडा शहरातील वन टाऊन परिसरातील एल. राव नगर येथे 20 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरू असताना सुजाता मदतीसाठी तेथे गेल्या होत्या.
महाप्रसादासाठी तयार करण्यात आलेला गरम सांबार दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम त्या करत होत्या. एका अन्य महिलेच्या मदतीने त्यांनी सांबाराने भरलेला टोप उचलला. तो खाली ठेवत असताना सुजाता यांचा तोल गेला आणि त्या थेट गरम सांबाराच्या टोपात पडल्या.
या दुर्घटनेत त्या गंभीररित्या भाजल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गणेशोत्सव मंडळासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.