करूर अपघातातील पीडितांच्या कुटूंबियांना विजयचा व्हिडिओ कॉल
वृत्तसंस्था/ चेन्नई
तमिळ सुपरस्टार आणि आता राजकीय नेता झालेला विजयने करुरच्या चेंगराचेंगरीत जीव गमाविणाऱ्या लोकांच्या परिवारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. ही दुर्घटना मागील महिन्यात तामिळनाडूच्या करुरमध्ये विजयच्या रॅलीदरम्यान घडली होती. तमिलगा वेट्री कझगम (टीव्हीके)च्या टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार विजयने आतापर्यंत 4-5 परिवारांशी संपर्क साधला आहे. यात महिला आणि मुलेही सामील असून त्यांनी स्वकीयांना या दुर्घटनेत गमाविले होते.
प्रत्येक व्हिडिओ कॉल 20 मिनिटांपर्यंत चालला, यादरम्यान विजयने परिवारांचे सांत्वन केल आणि मी तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यासोबत उभा राहणार असल्याचे त्याने सांगितले आहे. काही कारणांमुळे सध्या मी तुमची भेट घेऊ शकत नाही, परंतु लवकरच वैयक्तिक स्वरुपात तुम्हाला भेटायला येईन असे विजयने पीडित परिवारांना सांगितले आहे.
विजयने प्रत्येक परिवारासोबत संवेदनशीलपद्धतीने संभाषण केले आणि त्यांना शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. परिवारांनी विजयाच्या या कृतीचे कौतुक करत त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. विजयच्या टीमने संबंधित परिवारांना व्हिडिओ कॉलदरम्यान कुठलाही फोटो किंवा रेकॉर्डिंग न करण्याची विनंती केली होती.
कधी झाली होती दुर्घटना
मागील महिन्यात 27 सप्टेंबर रोजी करूरमध्ये विजयच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. ही दुर्घटना तामिळनाडूच्या राजकारणात मोठा मुद्दा ठरली होती, राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. तर दुर्घटनेप्रकरणी भाजप तसेच राज्यातील सत्तारुढ द्रमुकने विजयला थेट लक्ष्य केलेले नाही, परंतु टीव्हीकेच्या अनेक कार्यकर्त्यांना राज्याच्या पोलिसांनी अटक केली आहे, पण विजयचे नाव कुठल्याही एफआयआरमध्ये सामील नाही, या पूर्ण घटनेनंतर आता विजयचे हे मानवीय पाऊल संबंधित परिवारांचे दु:ख काहीअंशी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
Comments are closed.