स्थिर सर्व्हेच्या व्हिडीओग्राफरला केली मारहाण

मिलन सब वे येथे डय़ुटीला असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकातील व्हिडीओग्राफरला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी इफ्तिकार अहमद मोहम्मद अहमदच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मुंबईत सार्वत्रिक निवडणूक असल्याने काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शहरात सर्व ठिकाणी स्थिर सर्वेक्षण बूथ तयार करण्यात आले आहेत. या बूथच्या माध्यमातून प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते. तक्रारदार सुरेश राठोड हे स्थिर सर्वेक्षण पथकात काम करतात. त्याच्या सोबत एका खासगी पंपनीचे व्हिडीओग्राफी करणारे कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई हे काम करतात. शनिवारी रात्री मिलन सब वे येथे राठोड आणि त्याचे सहकारी तैनात होते. रात्री च्या सुमारास पांढया रंगाची कार तेथे आली. व्हिडीओग्राफर हा व्हिडीओग्राफी करत होता. तेव्हा मागील सीटवर बसलेल्या इफ्तिकार याने व्हिडिओग्राफी का करतात अशी विचारणा केली.

त्यानंतर राठोड याने आम्ही निवडणूक आयोगाचे काम करत असल्याचे इफ्तिकार याना सांगितले. इफ्तिकारने व्हिडीओग्राफरला मारहाण केली. त्यानंतर इफ्तिकार हा व्हिडीओग्राफरच्या मागे धावत आला. त्याला राठोड याने शांत राहण्यास सांगितले. इफ्तिकारने व्हिडीओग्राफरला धमकावले. घडल्या प्रकरणी राठोड याने विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. राठोड याच्या तक्रारीवरून विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Comments are closed.