दापोलीत ग्राममहसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार करण्यासाठी  १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दापोली तालुक्यातील नानटे  तलाटी सजेच्या  ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रीमती श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी युनिटने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी २५ फेब्रुवारी सायंकाळी दापोली तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या मित्रांनी दापोली तालुक्यातील मौजे तेरेवायंगणी येथे जमीन खरेदी केली होती. संबंधित खरेदीखताची सातबाऱ्यावर नोंद करून  त्याचा फेरफार मंजूर करण्यासाठी  नानटे तलाटी सजेच्या ग्राम महसूल अधिकारी  ( तलाठी ) श्रीमती श्रद्धा बालाजी बंडे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने पडताळणी करून सापळा कारवाईचे नियोजन केले. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने रक्कम दिल्यानंतर पथकाने तत्काळ छापा टाकत  श्रीमती श्रध्दा बंडे यांना ताब्यात घेतले.

संशयित श्रद्धा बंडे या मागील वर्षी सेवेत दाखल झाल्या होत्या. तहसील कार्यालयातच लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आल्याने महसूल विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

Comments are closed.