रेल्वे प्रशासनाने नोटिसा बजावल्याने ग्रामस्थांमध्ये संताप, कसाऱ्यातील चिमुकल्यांचे पंतप्रधानांना पत्रः आमची घरे, दुकाने वाचवा हो !

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दुकाने व घरांची जागा आमचीच असल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने कसाऱ्यातील स्थानिक नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून अनेक जण तर भीतीमुळे आजारीदेखील पडले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या दादागिरीविरोधात तिसरी, चौथीचे विद्यार्थी सरसावले आहेत. या 15 चिमुकल्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपल्या हाताने पत्रे लिहिली आहेत. आमचे आई-वडील, आजी-आजोबा अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी राहत असून मोदी साहेब, आमची घरे आणि दुकाने वाचवा हो… असे साकडे त्यांनी घातले आहे.

कसऱ्यातील सार्वजनिक जागांवर असलेली 133 दुकाने व शेकडो घरांना रेल्वेच्या वतीने नोटिसा बजावल्या आहेत. तब्बल एक महिन्यापासून रेल्वे प्रशासनाने ही सार्वजनिक जागा आपलीच आहे असे भासवून स्थानिक ग्रामस्थांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे अनेक दिवसांपासून कसारा गावातील ग्रामस्थ व दुकानदार भयभीत झाले आहेत. धसका घेतल्याने काही दुकानदार, घरमालक यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे हजारो ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत.

कळकळीचे आवाहन

15 विद्यार्थिनींनी पंतप्रधानांना पाठवलेल्या भावनिक पत्रात म्हटले आहे की आम्ही इयत्ता तिसरी, चौथीचे विद्यार्थी आहोत. आम्ही कसारा येथे अनेक वर्षांपासून राहतोय. आज आमची तिसरी पिढी आहे, पण मोदीसाहेब, आमच्या घरांना, दुकानांना रेल्वेने नोटिसा दिल्या. या नोटिसांची धास्ती घेऊन आमचे आजी-आजोबा आजारी पडले आहेत. मोदी साहेब आमची घरे, दुकाने वाचवा असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे. कसाऱ्यातील चिमुकल्या मुलांची पंतप्रधान नरेंद्र मोदी दखल घेणार का, असा एकच सवाल विचारण्यात येत आहे.

Comments are closed.