वणौशी भिवबंदर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला वनौशी ग्रामस्थांचा विरोध; गावकऱ्यांनी सभा घेऊन प्रकल्प नको असल्याचा घेतला निर्णय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी गावाच्या भिवबंदर आणि आघारी येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पा संदर्भात, महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत सामंजस्य करार स्वाक्षरित करण्यात आला आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, वणौशी तर्फे पंचनदी येथील ग्रामदैवत काळेश्वरी मंदिरात ग्रामस्थांची एक महत्त्वाची सभा पार पडली. या सभेत स्थानिक ग्रामस्थांनी हा अणुऊर्जा प्रकल्प गावात नकोच, अशी ठाम भूमिका घेतली.

दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी गावाचे भिवबंदर तसेच आघारी महसुली गावाच्या हद्दीत हा अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केला असून, या प्रकल्पाचा सामंजस्य करार मुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच करण्यात आला आहे. याविषयी विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवरून माहिती प्रसारित झाली असली, तरी येथील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीला किंवा स्थानिक ग्रामस्थांना या प्रकल्पाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. समाजमाध्यमांवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे, येथील स्थानिक आणि मुंबईवासीय ग्रामस्थांनी गावाच्या हिताचा विचार करण्यासाठी एकत्र येत एका संयुक्त सभेचे आयोजन केले होते. या सभेला स्थानिक तसेच मुंबईवासीय ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

सभेत बोलताना उपस्थितांनी, “लोटे एमआयडीसीचे केमिकल्सयुक्त पाणी वाशिष्टी नदीपात्रात सोडण्यात येते, ज्यामुळे दाभोळ खाडीतील मत्स्यसाठ्यावर विपरीत परिणाम होतो आणि मासे मृत पावतात. यावर प्रशासनाकडून साधी उपाययोजना केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी विध्वंस करणारा अणुऊर्जा प्रकल्प आमच्यावर लादल्यास त्याचे गंभीर परिणाम येथील फळबागा, शेतीपिके, समुद्रातील मासे आणि मानवी आरोग्यावर होतील,” अशी भीती व्यक्त केली. “सर्व काही सुरळीत चालले असताना हा प्रकल्प हवा आहे कोणाला?” असा सवाल उपस्थित करत, “भावी पिढीचे आरोग्य आणि परिसराची परिस्थिती लक्षात घेता हा प्रकल्प आमच्या माथी मारू नका,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

या सभेत सर्व राजकीय मतभेद विसरून गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि हा अणुऊर्जा प्रकल्प नकोच, असा एकमुखी निर्धार व्यक्त केला. त्यानंतर, ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री काळेश्वरीला गाऱ्हाणे घालून, “हा प्रकल्प वरच्यावरच जिरू दे,” अशी देवीला विनवणी केली. यापुढे ज्या-ज्या पातळीवर लढा देणे आवश्यक असेल, त्या-त्या पातळीवर कायदेशीर व जनआंदोलनाद्वारे लढण्याचा निर्णय एकजूटीने घेण्यात आला आहे.

Comments are closed.