Ratnagiri News – पालकमंत्री देवाभाऊंचे तळवे चाटत आहेत, विनायक राऊत यांची टीका; स्मार्ट मीटर विरोधात महावितरणवर शिवसेनेचा हल्लाबोल
अदानी देश महाराष्ट्र आणि मुंबई लुटायला निघाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील शेकडो एकर जमीन अदानीने लुटली आहे. महावितरणचे स्मार्ट मीटर लावण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे प्रामुख्याने अदानीला देण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरला वीजग्राहकांचा विरोध आहे. स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या बीलामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. चमकेशगिरी करणारे पालकमंत्री देवाभाऊंचे तळवे चाटत आहेत. बंद घर बघून मीटर लावणारी चोरांची ही दुसरी अवलाद आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी महावितरणच्या कारभाराचे वाभाडे काढले. आज स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महावितरणच्या रत्नागिरीतील अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ओव्हरस्मार्ट बनू नका, अशी तंबी यावेळी शिवसैनिकांनी दिली.
‘अंबानी तुपाशी जनता उपाशी’ ‘चले जाव चले जाव अंबानी चले जाव’ शिवसेना जिंदाबाद, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. माजी खासदार विनायक राऊत यांच्या नाचणे रस्ता येथील संपर्क कार्यालयापासून महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.
मुख्य अभियंता गायब…शिवसैनिक संतापले
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा नियोजित होता. आज मोर्चा महावितरणच्या कार्यालयात आला तेव्हा मुख्य अभियंता अनिल डोए कार्यालयात उपस्थित नसल्याचे शिवसैनिकांना कळताच एकच भडका उडाला. त्यानंतर मुख्य अभियंतांना मोबाईलवरून संपर्क करण्यात आला तेव्हा ते ओरस येथे बैठकीला गेल्याचे त्यांनी सांगितले. उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी मुख्य अभियंता यांना धारेवर धरले. तुम्ही आजच्या आज रत्नागिरीत येऊन माजी खासदार विनायक राऊत यांना भेटा असा सल्लाही त्यांनी दिला. मुख्य अभियंता उपस्थित न राहिल्याने संतापलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांनी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयातच स्मार्ट मीटर आणून फोडतो आणि पेटवतो, असा इशारा दिल्यानंतर वातावरण तापले.
अधीक्षक अभियंता यांनाही अपेक्षित उत्तरे देता आली नाहीत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सवा लाखांहून अधिक स्मार्ट मीटर लावण्याचे वृत्तपत्रीय टिपण महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसारित केले असताना अधीक्षक अभियंता यांनी आम्ही फक्त सरकारी कार्यालयातच स्मार्ट मीटर लावत असल्याचे थातूरमातूर उत्तर दिल्यानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत ओव्हर स्मार्ट होऊ नका.आपल्याला काही माहिती नाही का? किती स्मार्ट मीटर बसवले आहेत अशी विचारणा केली. त्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी महावितरणच्या कार्यालयात स्मार्ट मीटर बसवले असतील तर जुने आणि आत्ताचे बील दाखवा असे सांगितले. ते वीज बील आणताच त्या बीलातही तिप्पट वीज दरवाढ झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर. उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे,कमलाकर कदम महिला उपजिल्हासंघटक उल्का विश्वासराव, माजी सभापती अभिजीत तेली, शहरप्रमुख प्रशांत सांळुखे, माजी उपसभापती छोट्या गवाणकर, महिला विधानसभा संघटक सायली पवार, राजश्री शिवलकर, सेजल बोरट, शहर संघटक प्रसाद सावंत उपतालुकाप्रमुख महेंद्र चव्हाण उपस्थित होते.
स्मार्ट मीटर हे अदानी सोबतचे सेटलमेंट- बाळ माने
मोर्चाला मार्गदर्शन करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने म्हणाले की, स्मार्ट मीटर हे अदानीसोबत सरकारचे सेटलमेंट आहे. मुळात हे स्मार्ट मीटर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत. स्मार्ट मीटरला विरोध असताना ते जबरदस्तीने लावून सर्वसामान्यांच्या लूटमार सुरू आहे. जे अंधभक्त आहेत त्यांच्या घरी स्मार्ट मीटर लावा. ज्यांचा विरोध आहे त्यांच्या घरी लावलेले स्मार्ट मीटर काढून टाका.आजपासून स्मार्ट मीटर लावण्याचे काम बंद करा असा इशारा बाळ माने यांनी देताना आम्ही लवकरच स्मार्ट मीटरच्या विरोधातील १० हजार तक्रारी महावितरणला देणार आहोत असे ठणकावून सांगितले.
Comments are closed.